कार्यक्रमपत्रिकेत आयोजकांच्या, ठाण्यातील रंगकर्मीच्या कार्यक्रमांची रेलचेल अधिक

ठाण्यात होणाऱ्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे स्वरूप ‘राष्ट्रीय’ असले, तरी या संमेलनाच्या निमित्ताने ठाणेकर आयोजकच सादरीकरणाची हौस पुरेपूर भागवून घेणार असल्याचे चित्र आहे. संमलेनातील मुख्य कार्यक्रमांच्या आयोजनात ठाणे शहरातील नाटय़शाखेच्या कार्यक्रमांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. नाटय़संमेलनाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या उत्सवातून शहरातील नाटय़चळवळीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाण्यातील निर्मात्यांची, लेखकांची आणि वेगवेगळ्या नाटय़चळवळींची छाप यंदाच्या संमेलनातून दिसून येत आहे.

नाटय़संमेलन हा नाटय़कर्मीचा वार्षिकोत्सव असून वर्षभरातील नाटय़कृतींचा आणि रंगकर्मीच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव यातून केला जातो. असे असले तरी नाटय़संमेलनाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या उत्सवाच्या निमित्ताने आयोजक शहरात होणाऱ्या नाटय़चळवळींनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न संमेलनातून केला जातो. त्यामुळे गेली काही वर्षे आयोजक शाखेच्या कार्यक्रमांना कार्यक्रमपत्रिकेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळू लागले आहे. ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या निमित्ताने ठाणे शाखेनेही ठाण्यातील नाटय़चळवळींना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले आहेत. येथील नाटय़ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठीच कार्यक्रमपत्रिकेमधील अनेक कार्यक्रमांमध्ये ठाणे शहराला प्राधान्य देण्यात आले आहे, असा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे.  कार्यक्रमांची एकूण रूपरेषा पाहिल्यास सुमारे अध्र्याहून अधिक कार्यक्रमांवर ठाणेकरांची छाप असल्याचे स्पष्ट होत आहे. ठाणे शहरातील रसिक ठाण्यातील नाटय़चळवळीशी पहिल्यापासूनच जोडलेले आहेत. असे असताना नाटय़संमेलनातही ठाण्यातील मंडळींचेच सादरीकरण पाहायला मिळणार असल्याने दर्दी ठाणेकर रसिकांची निराशा होण्याची शक्यता आहे.

ठाणेकरांची छाप असलेले कार्यक्रम

  • स्व. भालचंद्र पेंढारकर यांना समर्पित विशेष कार्यक्रम
  • ‘ठाणे तिथे काही नाही उणे’ हा ठाणेकरांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारा कार्यक्रम
  • नाटय़संमेलनाची स्मरणिका
  • ठाण्यातील कलाकारांचा समावेश असलेली ‘कलावंत रजनी’
  • याशिवाय ‘संन्यस्त ज्वालामुखी, तिन्हीसांज, मंगळावर स्वारी, बालनाटय़, विविध प्रकारचे नाटय़ाविष्कार, मुक्त संवाद, वंचितांचा रंगमंच, महिलांचा दिर्घाक असे उपक्रम

ठाण्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा दिला जात असून शहरामध्ये अनेक सांस्कृतिक आणि नाटय़चळवळी कार्यरत आहेत. शहरात होणाऱ्या नाटय़संमेलनाच्या निमित्ताने या नाटय़परंपरा आणि नाटय़चळवळीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न नाटय़संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या नाटय़संमेलनावर संपूर्णपणे ठाणेकरांची छाप पडणार आहे. ठाण्यातील नाटय़परंपरा मोठी असून सध्याच्या काळातील नाटय़कर्मी मोठय़ा संख्येने ठाणेकर असल्याने त्यांचा प्रभाव निश्चितच नाटय़संमेलनावर राहील.

– नरेंद्र बेडेकर,  ठाणे नाटय़संमेलनाचे निमंत्रक