निमंत्रक नरेंद्र बेडेकर यांच्यावर अ‍ॅड. स्वाती दिक्षित यांचा असभ्य वर्तनाचा आरोप
ठाणे शहरातील विविध ठिकाणी ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे पूर्वारंभ कार्यक्रम सुरू झालेले असतानाच बुधवारी दुपारी संमेलनाचे निमंत्रक नरेंद्र बेडेकर आणि स्वत्व ग्रुपच्या अ‍ॅड. स्वाती दीक्षित यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्याचा प्रकार गडकरी रंगायतनमध्ये घडला. या प्रकारादरम्यान बेडेकर यांनी असभ्यपणे वर्तन केल्याचा आरोप स्वाती यांनी केला आहे, तर आमच्यात किरकोळ वाद झाल्याचा दावा करत कोणतेही असभ्य वर्तन केलेले नसल्याचे बेडेकर यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच या घटनेमुळे नाटय़ संमेलन सुरू होण्याआधीच त्याला गालबोट लागले आहे.
ठाणे शहरात ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन होणार असून या पाश्र्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी पूर्वारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या संमेलनाचे निमंत्रक म्हणून नरेंद्र बेडेकर हे काम पाहात आहेत. या संमेलनाच्या कामामध्ये स्वत्व ग्रुपच्या स्वाती दीक्षित मदत करीत आहेत. स्वत्व ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी इंटरनेटच्या साहाय्याने ज्येष्ठ रंगकर्मीची माहिती मिळवून त्या आधारे मोठा फलक तयार केला आहे. बुधवारी सकाळी त्यांनी हा फलक गडकरी रंगायतन परिसरात लावला होता. मात्र या फलकावरील माहिती चुकीची असल्याचे सांगत बेडेकर यांनी फलक काढण्याचा आग्रह धरला. त्या वेळी दीक्षित यांनी चुकीची माहिती वगळून सुधारीत माहितीचा फलक लावाण्यास परवानगी देण्याची विनंती केली. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, ज्येष्ठ रंगकर्मी यांच्याविषयी बाल प्रेक्षकांना आणि नव्या पिढीतील नाटय़कर्मीना माहिती व्हावी, या उद्देशातून हा फलक तयार करण्यात आला होता, मात्र त्यात चुकीची माहिती असल्याचा आक्षेप घेतल्याच्या कारणावरून बेडेकर यांच्यासोबत वाद झाला. त्या वेळी त्यांनी आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप दीक्षित यांनी केला. तसेच या वादामुळे आपल्याला नाटय़ संमेलनाच्या पूर्वारंभ कार्यक्रमासाठी प्रवेश नाकारण्यात आला असून आपले ओळखपत्रही त्यांनी जप्त केले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. या संदर्भात बेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी किरकोळ वाद झाला असल्याचा दावा केला.