tvlog01येऊरच्या जंगलात तर अशी फुले वर्षभर येतच राहतील आणि त्या ओढीने आपण पुन्हा पुन्हा या जंगलाला भेट देऊच. पण आता खरे वेध लागले ते ‘कास’ येथे फुलणाऱ्या पुष्पपठाराचे. सातारा शहरापासून अवघ्या ४० किमीच्या अंतरावर असणारे हे ‘पुष्पपठार’ म्हणजे सौंदर्याच्या बाबतीत सह्य़ाद्रीच्या, पश्चिम घाटाच्या गळ्यातला ताईत म्हणावा लागेल. सौंदर्याला एक शाप असतोच, तो म्हणजे अल्पायुषाचा आणि हे या पठाराबाबत अगदी खरं आहे. संपूर्ण वर्षांतील फक्त एकच महिना म्हणजे श्रावणातील शेवटचे १५ दिवस आणि भाद्रपदातील पहिले १५ दिवस हे पठार आपल्या सौंदर्याची उधळण दोन्ही हातांनीच नव्हे तर सर्वागाने करत असत.
कास पठाराकडे म्हणजे सातारा शहराकडे जाणारा रस्ता खंबाटकी या घाटातून जातो. या घाटातली एकूणच वनसंपदा प्रचंड आणि विविधता अमाप. वळणावळणावर गाडी थांबवून उतरून पाहावीत अशी फुलं. त्यातलंच एक नेहमी भुरळ घालणारं फूल आहे विंचवी. कमरेइतक्या उंचीच्या या हर्बच्या सशक्त बुंध्याला खालपासूनच फांद्या फुटतात. तळहाताएवढय़ा हृदयाकृती पानांवर लव असते. ही लव इतकी मऊ असते आणि इतकी रेशमी असते की, वेलवेटच्या कापडावरून हात फिरवल्याची भावना व्हावी. वरून पोपटी रंगाची ही पानं खालून मात्र भुरकट पांढरी असतात. पानावरच्या केसात झाडाने स्रवलेला एक चिकट द्राव पसरलेला असतो. तो अगदी दवबिंदूसारखा दिसतो. त्याला उग्र वास असतो. पानावरून हात काढल्यावरसुद्धा हा चिकट स्पर्श हाताला जाणवत राहतो.
तिळाच्या फुलांशी साधम्र्य असणारी ही फुलं फारच शोभिवंत असतात. घंटेच्या आकाराच्या या फुलाच्या पाच गुलाबी पाकळ्या टोकाला जांभळ्या असतात. सर्व फुलं जमिनीच्या दिशेने वळलेली असतात. पण वैशिष्टय़पूर्ण गोष्ट अशी की, या पाच पाकळ्यांतली जमिनीच्या बाजूला असणारी पाकळी इतर पाकळ्यांच्या तुलनेत मोठी असते. त्यावरचा जांभळा रंग जास्तच चमकदार असतो. या जांभळ्या रंगामधून एक पिवळ्या ठिपक्यांनी तयार झालेला पट्टा थेट फुलाच्या आत मधाच्या साठय़ापर्यंत पोहोचणारा असतो. ही मोठी पाकळी हा परागीभवन करणाऱ्या किडय़ाला उतरण्यासाठी असलेला लँडिंग प्लॅटफॉर्म असतो आणि पाकळीवर उतरलेल्या परागीभवन करणाऱ्या
एजंटला पुढे मधापर्यंत पोहोचण्याचा रस्ता दाखवण्याचं काम हे पिवळे ठिपके करतात. मधाच्या साठय़ापर्यंत पोचण्याच्या धडपडीत किडय़ाकडून परागीभवन होतं आणि हिरवं, दोन वक्राकार काटे असणारं फळ झाडावर दिसू लागतं. हे हिरवं फळ नंतर काळं आणि खडबडीत बनतं. या काटय़ांमुळे त्याला डेव्हिल्स क्लॉ म्हणतात. (म्हणजे सैतानाचा पंजा) पण फळावरचा काटा विंचवाच्या नांगीची आठवण करून देतो म्हणून विंचवी हे नावपण समर्पक आहे.
पूर्वीच्या काळी जेव्हा क१टकनाशकं नव्हती तेव्हा रात्री झोपताना बिछान्याभोवती याची पानं पसरून ठेवत. त्यामुळे बिछान्याकडे येणारे किडे, मुंग्या, ढेकूण या पानावरच्या केसात अडकत व चिकट द्रवामुळे त्यांची हालचाल बंद होत असे.
अशा अनेक औषधी तसेच विस्मयकारी फुलांनी सजलेला हा ‘खंबाटकी’ घाट पुढे साताऱ्याला
जाऊन मिळतो. जिथून पुढे अवघ्या चाळीस किमीच्या अंतरावर ‘कासचं पुष्पपठार’ आहे. या पठाराकडे जाणाऱ्या वाटेवर इतकं सौंदर्य तर प्रत्यक्ष पठारावर किती
असेल?

महाराष्ट्राचं ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ अर्थात ‘कासचे पुष्पपठार’ यावर फुललेली रानफुलं पाहण्यासाठी १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नेचर ट्रेलचे आयोजन केलं आहे. यात ठोसेघर आणि चाळकेवाडीपण पाहता येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी
मेधा कारखानीस यांच्या ९८२०१०१८६९ या क्रमांकावर नावनोंदणी करावी.