उल्हासनगर क्राइम ब्रांचने अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची 24 तासांत सुटका केली आहे. 20 वर्षीय तरुणाने हे अपहरण केलं होतं. ठाणे रेल्वे स्थानकावरुन आरोपी सुरज सिंह दारा सिंहला अटक करण्यात आली. आरोपी मुळचा अलाहाबादचा आहे. मुलाच्या मावशीचं प्रेम मिळवण्यसाठी त्याने हे अपहरण केलं होतं. पण अखेर तो पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी चार वाजता मुलाचं अपहरण झालं होतं. गुन्हा दाखल करत हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आलं होतं. आरोपी मुलाच्या मावशीच्या प्रेमात होता आणि अपहरण झालं त्यादिवशी सकाळी विठ्ठलवाडीत तिला भेटण्यासाठी आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.

मुलाचं अपहरण केल्यानंतर आरोपीने त्याला विक्रोळीतील मित्राच्या घऱी ठेवलं. यानंतर त्याने मुलाच्या मावशीला फोन करुन भेटायला येण्यास सांगितलं. त्याने येताना एकटं येण्यास सांगितलं होतं. अन्यथा मुलाची हत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी आऱोपीला अटक करण्यासाठी जाळं टाकलं होतं पण तोपर्यंत त्याने कुर्लाहून विक्रोळीला आणि तेथून ठाण्याला पळ काढला.

पोलिसांनी मुलाच्या मावशीला ठाणे रेल्वे स्थानकावर पाठवलं. आरोपीच्या तिच्या जवळ येताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या अशी माहिती उल्हासनगर क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे. मुलाला पालकांकडे सोपवण्यात आलं आहे.

मुलाची मावशी आधी सुरतमध्ये राहत होती. आरोपी तिच्या शेजारीच राहत होता. आरोपी महिलेच्या प्रेमात होता. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून तिने बहिणीच्या घऱी विठ्ठलवाडीत येऊन राहण्यास सुरुवात केली होती. पण आरोपीने येथेही पाठलाग करत मुलाचं अपहरण केलं असं पोलिसांनी सांगितलं आहे.