अबोली रिक्षाचालक गुन्हा प्रकरण

विरारमधील अबोली महिला रिक्षाचालकावर वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. ऑटो रिक्षाचालक मालक महासंघाने महिला रिक्षाचालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून या कारवाईच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

विरार शहरात शासनाकडून परवाना घेऊन स्थानिक मराठी महिलांनी स्वत:चा रिक्षा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र त्याला परप्रांतीय पुरुष रिक्षाचालकांकडून विरोध होतो आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे या महिला रिक्षाचालकांना त्रास देत असतात. महिला रिक्षाचालकांना प्रवासी भरू न देणे, त्यांना दमदाटी करणे असे प्रकार होत असतात. वाहतूक पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे पोलीसही या पुरुष रिक्षाचालकांच्या बाजूने असतात. याच प्रवासी भरण्याच्या मुद्दय़ावरून वाहतूक पोलिसांनी विरारमधील महिला रिक्षाचालक दर्शिका विसावाडिया हिच्यावर गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा निषेध ऑटो रिक्षाचालक मालक महासंघाने निषेध केला आहे. पोलिसांनी सूडबुद्धीने ही कारवाई केली असून महिला रिक्षाचालकांना शहरात व्यवसाय करू न देण्याचा कटाचा हा भाग असल्याचा आरोप महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी केला आहे. पोलिसांवर टीका केल्यानेच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक रिक्षावाले बेकायदेशीर प्रवासी भरतात. पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही. मात्र स्थानिक मराठी महिलेवर लगेच गुन्हे दाखल करतात याकडे लक्ष वेधले. या प्रकरणाचा निषेध करून खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी हा खोटा गुन्हा नसल्याचा दावा केला. जनमत या महिला रिक्षाचालकांच्या विरोधात आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही बेकायदेशीर रिक्षाचालकाविरोधात कारवाई करत असतो. या महिलांना स्वतंत्र स्टॅण्ड हवा असल्यास आमची हरकत नाही, असेही ते म्हणाले.  वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.