नियम धाब्यावर बसवून भुईगावमध्ये पर्यटकांचा धिंगाणा

वसई : टाळेबंदी शिथिलीकरणाचा महत्त्वाचा टप्पा सोमवारपासून सुरू होताच पहिल्याच दिवशी वसईतील भुईगाव आणि राजोडी येथील किनाऱ्यावर हौशी पर्यटकांसह नागरिकांनीही मोठी गर्दी केली. या वेळी अंतरनियमाचा भंग तर झालाच; पण अनेकांनी तोंडावरील मुखपट्टय़ाही बाजूला सारल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. यामुळे किनारालगतच्या रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून अतिउत्साही पर्यटकांच्या आततायीपणाविरुद्ध भुईगावच्या ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

वसईच्या पचम पट्टय़ात सुरुच्या बागेपासून थेट अर्नाळापर्यंत निसर्गरम्य विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभली आहे. किनाऱ्यावर अनेक ठिकाणी रिसॉर्ट्स असल्यामुळे भुईगाव, राजोडी, कळंब, नवापूर, अर्नाळा या ठिकाणचे किनारे रोज पर्यटकांनी गजबजलेले असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून किनाऱ्यांवर सामसूम पसरली होती. सोमवारपासून टाळेबंदीतील शिथिलीकरणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला सुरुवात होताच वसईतील भुईगाव आणि राजोडी या किनाऱ्यावर गावाबाहेरील नागरिक तथा पर्यटकांचे थवेच्या थवे दुचाकी, चारचाकी वाहनांतून किनाऱ्यावर येताना दिसू लागले. एकेका दुचाकीवर तीन अथवा चार जण किनाऱ्यावर जाताना दृष्टीस पडतात.

रविवारच्या संध्याकाळी भुईगावच्या किनाऱ्यावर जवळपास २५०-३०० पर्यटकांनी अक्षरश: धिंगाणा घातला. यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींची संख्या मोठी होती. यापैकी अनेकांनी किनाऱ्यावर पाऊल पडताच एकांतासाठी निर्मनुष्य कोपरे गाठण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे अशा सार्वजनिक ठिकाणांवर विषाणू फैलण्याची भीती सर्वाधिक असतानाही उतावीळ पर्यटकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे काम किनाऱ्यावर सुरू झाल्याचे दिसत आहे. शारीरिक अंतराच्या नियमभंगाबरोबरच तोंडावरील मुखपट्टी काढून अनेक जण किनाऱ्यावर हिंडताना दिसून येतात.

अनेक जण गटागटाने किनाऱ्यावर मद्यपान करताना आढळून येतात. त्यामुळे किनाऱ्यावरील पर्यटन बंद ठेवण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक हरिश्चंद्र पाटील यांनी केली आहे.

भूईगावाबाहेरील लोक रोज फक्त मौजमस्ती करण्यासाठी किनाऱ्यावर येत असल्याने करोना बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. करोनाच्या काळात किनारे पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. त्याची अम्मलबजावणी व्हावी.

– सचिन मर्ती, ग्रामस्थ

करोनाबाधित एखादा रुग्ण जर गर्दीत फिरत असेल तर त्यांचे संक्रमण इतरांनाही होऊ  शकते. यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याउलट परिस्थिती भुईगावच्या किनाऱ्यावर दिसत आहे. महापालिका तथा पोलीस यंत्रणेने याकडे त्वरेने लक्ष देणे गरजेचे आहे.”

– एव्हरेस्ट डाबरे, ग्रामस्थ