नायगाव येथून परदेशात नोकरीसाठी गेलेले विल्यम लोबो हे गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांच्या पत्नी हवालदिल झाल्या असून त्यांनी पोलीस आणि दूतावासाकडे मदत मागितली आहे.

लीना लोबो (४०) या नायगावच्या विजया पार्कमध्ये नऊ वर्षांच्या मुलासह राहतात. त्या पूर्वी इस्रायलमध्ये ब्रिटिश दूतावासात नोकरी करत होत्या. २००३ मध्ये त्यांची ओळख विल्यम लोबो यांच्याशी झाली. त्यानंतर विल्यम यांना घेऊन त्या इस्रायलला गेल्या होत्या.  २००६ मध्ये त्या दोघांनी भारतात येऊन लग्न केले. लग्नानंतर लीना वसईत राहू लागल्या, तर विल्यम नोकरीसाठी पुन्हा इस्रायलला गेले. एका अपंग व्यक्तीकडे विल्यम केअर टेकर म्हणून कामाला होते.

काही वर्षे विल्यम नियमित परदेशातून वसईत येत होते. २००९ मध्ये ते शेवटचे वसईत आले होते. परंतु कामामुळे विल्यम भारतात येऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात ते आपल्या पत्नीला नियमित पैसे पाठवत होते, परंतु गेल्या पाच महिन्यांपासून विल्यम यांचा संपर्क  होत नसल्याने त्या धास्तावल्या आहेत.  विल्यम यांच्या सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली तरी काही माहिती मिळालीे नसल्याचे लीना यांनी सांगितले.

माझे पतीे विल्यम माझ्या नियमित संपर्कात होते.  पण अचानक त्यांचा सर्व संपर्क तुटला आहे. त्यांच्याकडून येणारी आर्थिक मदत बंद झाल्याने उपजीविकेचा प्रश्न तर निर्माण झाला आहे, पण त्यांच्या सुरक्षिततेचीही चिंता सतावत आहे.

– लीना लोबो.