भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये या महिला कैद्याच्या हत्येचा प्रकार ताजा असतानाच ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात एका आरोपीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काल रात्री त्याने कोठडीतील स्वच्छतागृहाच्या लोखंडी गजाला टी-शर्टच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी कारागृहांतर्गत, न्यायलयीन, स्थानिक पोलीस तसेच गुन्हे अन्वेशन विभागालाही चौकशीसाठी कारागृह प्रशासनाकडून निवेदन देण्यात आले आहे.

आशिष अनुप बरणवाल (वय २२) या आरोपीने आत्महत्या केली असून तो डोंगरी-वसई येथील रहिवासी असून त्याला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलत्कार केल्याप्रकरणी वाळूंज पोलिसांनी अटक केली होती. गेल्या १ वर्षापासून तो या तुरूंगात शिक्षा भोगत होता.
दुसरा एक कैदी शौचालयात गेल्याने हा प्रकार उघडकास आला होता. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने चौकशी सुरु केली असून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसह स्थानिक पोलीस तसेच सीआयडीला चौकशीसाठी निवदेन देण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील ही आत्महत्येची दुसरी घटना असून यापूर्वी ज्या कैद्याने आत्महत्या केली होती तो देखील बलात्कार प्रकरणातील आरोपी होता.

या मध्यवर्ती कार्यालयात एकूण ३२०० कैदी असून १९७ पोलीस कर्मचारी आहेत. त्यातील फक्त ७५ ते १०० कर्मचारी हे कैद्यांच्या देखरेखीसाठी आहेत. पोलीसांची ही संख्या अल्प असून ६ कैद्यांमागे १ शिपाई असा नियम असताना यापेक्षा कितीतरी अधिक कैद्यांवर देखरेखीचा ताण इथल्या कर्मचाऱ्यांवर आहे. कारागृहाची क्षमता ११०० कैद्यांची असून त्यात ३२०० कैदी आहेत, तर त्यातुलनेत पोलीस बळ कमी आहे.