24 September 2020

News Flash

‘इंद्रधनू रंगोत्सव’मध्ये डॉ. लागूंना आदरांजली

येत्या शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

येत्या शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

ठाणे : ठाणेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या ‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सवात’ यंदाही वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रंगभूमीवरील बहुआयामी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या कारकीर्दीला अभिवादन देण्यासाठी ‘नटसम्राटाला आदरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. गडकरी रंगायतन येथे रंगणाऱ्या या सोहळ्याचे हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव’ सोहळा शनिवार, १८ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून रंगणार आहे. इंद्रधनू रंगोत्सवाचे यंदाचे २४ वे वर्ष असून यंदाचा हा सोहळा ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने होत आहे. यंदाचा रंगोत्सव दोन सत्रात पार पडणार आहे. पहिल्या सत्रात ‘नटसम्राटाला आदरांजली’ या दृकश्राव्य, संगीतमय कार्यक्रमाद्वारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या मानवंदना कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, सागर तळाशिलकर, अमित पाध्ये, मकरंद जोशी यांचा समावेश असणार आहे. यावेळी सागर तळाशिलकर हे लमाण या डॉ. श्रीराम लागूंच्या आत्मचरित्रातील काही उताऱ्यांचे उपस्थितांसमोर अभिवाचन करणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकात डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी सहकलाकाराची भूमिका साकारली होती. त्या नाटकातील

आपला अभिनय रवी पटवर्धन सादर करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्या सुहास जोशी या दृकश्राव्य माध्यमातून डॉ. श्रीराम लागूंनी लिहिलेल्या ‘वाचिक अभिनय’ या पुस्तकातील एका उताऱ्याचे वाचन करणार आहेत.

तसेच सुप्रसिद्ध ऑर्गनवादक अमित पाध्ये हे डॉ. श्रीराम लागूंशी संबंधित चित्रपटांतील गाण्यांचे वादन ‘नटसम्राटाला आदरांजली’ या कार्यक्रमात करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मकरंद जोशी करणार आहेत.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात हिंदी चित्रपट सृष्टीतील मराठी प्रतिभावंतांचे योगदान या संकल्पनेवर आधारित ‘माहिरे’ अर्थात माय मराठीतले हिरे हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.

’ काय?: इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव

’ कुठे? : गडकरी रंगायतन, ठाणे

’ कधी? : शनिवार, १८ जानेवारी.     सायं. ५ वा. पासून.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:02 am

Web Title: a tribute to dr shriram lagoo in indradhanu rangotsav zws 70
Next Stories
1 पालिकेकडूनच अतिक्रमण
2 जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी लहान आकाराचे सिलिंडर
3 ओढ मातीची : लंडनच्या नाताळला वसईचा गोडवा
Just Now!
X