05 March 2021

News Flash

धक्कादायक! वसईत लोकलमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला करत लुटलं

रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीने गाठलं रुग्णालय

वसईत लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करत लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीची पडताळणी करत आहेत. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. डोक्यातून रक्त वाहत असताना त्याच अवस्थेत तिने रुग्णालय गाठलं. वसई रेल्वे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मूळची वसईची असणारी तरुणी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी चालली होती. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास तरुणीने वसई स्थानकावरील १ नंबर प्लॅटफॉर्मवरुन अंधेरीला जाणारी स्लो लोकल पकडली. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्यात चढला आणि फोन खेचण्याचा प्रयत्न करु लागला.

“तरुणीने आरोपीला डब्यात शिरताना पाहिलं नसल्याने तिला आश्चर्य वाटलं. आरोपीने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर एका वस्तूने हल्ला केला. तरुणी यावेळी विरोध करत होती. यावेळी ती वस्तू ट्रेनच्या बाहेर फेकली गेली. यानंतर त्याने तिच्या गळ्यातील चेन ओढली. तुटलेल्या चेनचा काही भाग उचलून त्याने नायगाव स्थानक येताच उडी मारुन पळ काढला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अचानक झालेल्या या सर्व प्रकारामुळे धक्का बसलेल्या तरुणीच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तरुणी नायगाव स्थानकात उतरली आणि रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी उपचार केले असून काही टाके पडले आहेत. कुटुंबाशी बोलल्यानंतर तरुणीने वसई रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तरुणी लोकलच्या डब्यात एकटी आहे यावर आरोपी लक्ष ठेवून होता. बराच वेळ तो वसई रेल्वे स्थानकावर फिरताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याने याआधीही असे गुन्हे केल्याची शक्यता आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 9:21 am

Web Title: a woman attacked and robbed in vasai railway station sgy 87
Next Stories
1 कळवा खाडीपूल ऑक्टोबरमध्ये खुला
2 ‘कोस्टल रोड’चा आराखडा तयार
3 कुपोषित बालकांसाठीचे खजूर गोदामात कुजत
Just Now!
X