नालासोपारा येथे 32 वर्षीय महिलेने पतीच्या तिसऱ्या पत्नीची अल्पवयीन सावत्र मुलींच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. योगिता देवरे यांचा मृतदेह 1 मार्च रोजी नालासोपाऱ्यात सापडला होता. त्यावेळी पोलीस मृतदेहाची ओळख पटवू शकले नव्हते. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीत एक रिक्षा संशयास्पदरित्या फिरत असल्याचं दिसत होतं. या रिक्षाच्या आरशावर जानवी असं नाव होतं. क्राइम ब्रांचने तपास करताना जवळपास चार हजार रिक्षांची तपासणी केली आणि अखेर ज्या रिक्षातून मृतदेह नेण्यात आला होता तिचा शोध लावला.

रिक्षाचालक निरज मिश्रा याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर पार्वती मानेला अटक करण्यात आली. पार्वती माने ही सुशील मिश्राची दुसरी पत्नी आहे. सुशील मिश्रा कंत्राटी कामगार आहे. सुशील याची पहिली पत्नी उत्तर प्रदेशात राहते तर तिच्या दोन्ही मुलींचा पार्वती माने सांभाळ करते.

एक वर्षांपूर्वी सुशील मिश्रा याने योगिता देवरे हिच्याशी तिसरं लग्न केलं होतं. यानंतर सुशील मिश्रा याने पार्वती माने आणि दोन्ही मुलींना सोडून योगिता देवरेसोबत नालासोपाऱ्यातच नव्याने संसार मांडला. पार्वती मानेने दिलेल्या माहितीनुसार, सुशील मिश्रा याने आपल्याला आणि मुलींना आर्थिक मदत देणं पूर्णपणे बंद केलं होतं. आपल्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यासही त्याने नकार दिला होता. योगिता देवरेसमोर तो वारंवार आपला अपमान करत होता.

याचवेळी पार्वती मानेने आपल्या दोन्ही सावत्र मुलीसोंबत योगिते देवरेच्या हत्येचा कट आखला. यासाठी तिने एका मुलीचा प्रियकर शैलेश काळे याचीही मदत घेतली. शुक्रवारी सकाळी सुशील एका लग्नासाठी अहमदाबादला गेला होता. यावेळी पार्वती माने आपल्या दोन्ही सावत्र मुली आणि शैलेश काळे यांच्यासोबत देवरेच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी सुरक्षारक्षकाला दारुचं अमिष दाखवलं आणि डुप्लिकेट चावी वापरत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. योगिता देवरे झोपेत असतानाच तिची गळा दाबून हत्या कऱण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

यानंतर शैलेश काळे याने रिक्षाचालक असणारा बहिणीचा प्रियकर नीरज मिश्रा याला बोलावलं. योगिता देवरेची प्रकृती ठीक नसून तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं खोटं त्याला सांगण्यात आलं. आपल्या रिक्षातून मृतदेह नेत असल्याची नीरज मिश्रा याला कल्पना नव्हती. एका निर्जनस्थली आरोपींनी नीरज मिश्राला परत जाण्यास सांगितलं. आम्हाला रुग्णालय शोधण्यास वेळ लागेल असा खोटा बहाणा त्यांनी केला. यानंतर मृतदेह टाकून आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.