ठाणे : करोना काळात परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने दीड हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते. हे अनुदान मिळवण्याकरिता ऑनलाइन अर्ज दाखल करताना रिक्षाचालकांची तारांबळ उडत आहे. तसेच अनेक तांत्रिक अडचणीही येत आहेत. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण कार्यालयांत आधार केंद्रे सुरू केली आहेत. त्यास रिक्षाचालकांचा प्रतिसाद मिळत आहे.

रिक्षाचालकांना अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. अर्ज भरताना रिक्षाचालकांचा आधार क्रमांक हा त्यांच्या बँक खात्याशी आणि मोबाइल क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे. अनेक रिक्षाचालकांचा आधार क्रमांक मोबाइलशी संलग्न नसल्याने अर्ज भरला जात नव्हता. रिक्षाचालकांची आधारकार्डाशी संबंधित असलेली कामे तात्काळ व्हावीत आणि ते अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कार्यालयात आधार केंद्रे सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. त्यास त्यांनी परवानगी दिल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात आधार केंद्रे सुरू करण्यात आली. ठाणे विभागात नोंदणीकृत सुमारे ८४ हजार परवानाधारक रिक्षाचालक आहेत. आतपर्यंत केवळ १६ हजार रिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले तर यापैकी ११ हजार ७२० रिक्षाचालकांचे अर्ज वैध ठरले.

आधार क्रमांक बँक खात्याशी आणि मोबाइल क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे असून ते नसल्यामुळे रिक्षाचालकांचे अनुदानाचे अर्ज भरले जात नाहीत. म्हणून परिवहन कार्यालयात आधार केंद्रे सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली होती.  त्यानुसार ती सुरू करण्यात आली आहेत. जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे