ठाणे महापालिकेच्या मुख्यालय आणि प्रभाग समित्यांमधील वर्षभरापूर्वी बंद करण्यात आलेली आधार कार्ड नोंदणी केंद्राची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता शहरातील टपाल कार्यालयांपोठापाठ आता नागरिकांना पालिका मुख्यालय आणि नऊ प्रभाग समित्यांच्या कार्यालयामध्ये आधारकार्ड नोंदणी आणि त्यातील दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या नवीन केंद्रांमुळे शहरात सुरू असलेल्या दोन ते तीन खासगी आधार केंद्रांबाहेर लागणाऱ्या रांगा आता कमी होणार असून नागरिकांनाही आधार नोंदणीसाठी रांगेत ताटकळत उभे रहावे लागणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली असून त्यामध्ये ठाणे, वागळे, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर या परिसराचा समावेश आहे. केंद्र शासनाने बँक खाते तसेच विविध योजनांसाठी आधार नोंदणी सक्तीची केली आहे. त्यामुळे आधार केंद्रांवर नोंदणी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून पाहाव्यास मिळत आहे. मात्र, महापालिका मुख्यालय, प्रभाग समित्या आणि शाळांमध्ये सुरू असलेली आधार केंद्रे वर्षभरापूर्वी बंद करण्यात आली होती. खासगी संस्थेमार्फतही केंद्रे चालविण्यात येत होती. ही केंद्रे बंद झाल्यामुळे शहरात दोन ते तीन ठिकाणी खासगी आधार केंद्रे सुरू होती. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत ही केंद्रे अपुरे पडत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या लांब रांगा लागत होत्या. गेल्या महिन्यात शहरातील टपाल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यापाठोपाठ आता महापालिका प्रशासनाने मुख्यालय आणि नऊ प्रभाग समिती कार्यालयांमध्ये खासगी संस्थेमार्फत पुन्हा आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, माजिवाडा-मानपाडा आणि कळवा प्रभाग समितीमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित केंद्र येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

आधारकार्ड केंद्र..

ठाणे येथील पाचपाखाडी भागातील महापालिकेची मुख्यालय इमारत आणि माजिवाडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्य-सावरकर, वागळे, नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या नऊ प्रभाग समित्यांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे केंद्र सुरू राहणार आहे. या ठिकाणी नवीन आधार कार्ड नोंदणी आणि आधार कार्ड दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.