आधारवाडीकरांचा निर्णायक आंदोलनाचा संकल्प

‘गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ आम्ही कचऱ्याला लागणाऱ्या आगीच्या धुराच्या सान्निध्यात राहात आहोत. या धुराने आमचे आयुष्यच काळवंडले गेले आहे. अशात पाडव्याचा आनंद तरी कसा साजरा करायचा?’ असा उद्विग्न सवाल करत आधारवाडीच्या रहिवाशांनी यंदा कचराभूमीवरच काळी गुढी उभारण्याचा निर्धार केला आहे. राजकीय आणि प्रशासकीय नाकर्तेपणामुळे गेली अनेक वर्षे आधारवाडी कचराभूमीच्या समस्येने त्रस्त झालेल्या स्थानिकांनी आता ही लढाई निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्याचा संकल्पच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोडला आहे.

कल्याणच्या आधारवाडी कचराभूमीची क्षमता संपल्यानंतरही त्यावर सुरू असलेले कचराफेक आणि येथे वारंवार लागणाऱ्या आगींमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांच्या प्रतिक्रियांमुळे यंदाचा गुढीपाडवा कल्याणकरांसाठी काहीसा तणावाचा ठरू लागला आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री कल्याणात येतात आणि स्मार्ट सिटीच्या गप्पा मारतात तेव्हा हसावे की रडावे असे आम्हाला होऊन जाते, अशी प्रतिक्रिया येथे व्यक्त होताना दिसते. आधारवाडीच्या या कचराभूमीवर आतापर्यत सुमारे १९ लाख मेट्रिक टन कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. कितीतरी उंच असा हा कचऱ्याचा डोंगर येथील रहिवाशांच्या मनात धडकी भरवू लागला आहे. उन्हाळा आला की येथे कचऱ्याला आग लागते. त्यासाठी प्रशासनाकडून शास्त्रीय कारणे दिली जातात. गेली काही वर्षे सातत्याने हे प्रकार घडत आहेत. आता सहनशीलतेचा बांधही फुटून वाहू लागला आहे, असे या भागातील रहिवाशी कांचन साळवी यांनी सांगितले. यंदा महापालिका निवडणुका जोरात झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी वरचेवर कल्याणात येत होते. ‘अच्छे दिनाचे’ वातावरणही जोरात होते. त्यामुळे आधारवाडीची  कचराभूमी पुढे उंबर्डेला जाईल आणि मरणयातनातून आमची सुटका होईल, अशी आशा अजूनही आहे. मात्र, या धुराने जीव कोंडतो, अगदी नकोसे होते तेव्हा संताप होतो, असे याच भागात असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या आभा परांजपे यांनी सांगितले.

कचराभूमीवर यंदा लागलेली आग अतिशय तीव्र असून त्याच्या धुराने स्थानिकांचा श्वास कोंडला आहे. आधारवाडीमध्ये यंदा सुरू झालेल्या धुरांच्या लोटांची तीव्रता अधिक असून त्यापासून धुलिकणांची सर्वाधिक निर्मिती होऊ  लागली आहे. अगदी कल्याण रेल्वे परिसरापर्यंत या धुराचे लोट घुमसत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, डोळे चुरचुरणे, उलटय़ा आणि चक्कर येणे आणि अन्य तात्काळ पसरणारे आजार वाढीस लागले आहेत. त्यामुळे यंदा पाडव्याला कचराभूमीवरच काळी गुढी उभारण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे.

शहरामध्ये स्वागतयात्रांच्या निमित्ताने लोक रस्त्यावर येऊ न जनजागृती करत असताना आपल्या घरामध्ये लागलेल्या कचऱ्याच्या आगीकडे दुर्लक्ष होत आहे. मी सामान्य कल्याणकर म्हणून या प्रश्नाचे गांभीर्य आहे. त्यामुळे या प्रश्नावर आत्ताच मला घराबाहेर येऊन काहीतरी करण्याची गरज आहे. त्यामुळे रविवारी सकाळी मी आणि माझे मित्र आधारवाडी कचरा भूमीजवळ जाऊन निषेधाची काळी गुढी उभारणार आहे. संपूर्ण कल्याणकरांनी या गुढी उभारण्यास सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा. प्रदूषणमुक्त कल्याणसाठी रस्त्यावर उतरण्याची ही अखेरची संधी असू शकते.

योगेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते