मॅगेसेसे पुरस्कार मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांचा अंबरनाथ शहरात येत्या ६ डिसेंबर रोजी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. शहरातील अनेक मान्यवर संस्था, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी सदस्य या आयोजन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. शहरात गेली ४८ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या भगिनी मंडळाने यंदा त्यांच्या पश्चिमेकडील शाळा क्रमांक दोनमध्ये महामानव बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित ६, ७ व ८ डिसेंबर असे तीन दिवस प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता आमटे दाम्पत्याच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आमटे दाम्पत्याचा नागरी सत्कार होणार आहे, अशी माहिती डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांनी दिली.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याला हातभार म्हणून शहरातील सर्व संस्था तसेच व्यक्तींनी यथाशक्ती निधी देण्यासाठी महारोगी सेवा समिती, वरोरा या नावानेच धनादेश तयार करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मदतीचे धनादेश २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भगिनी मंडळ शाळा, साई विभाग, अंबरनाथ (पूर्व) येथे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- ९१३०६६०६९२.