News Flash

पुत्रप्रेमासाठीच नेत्यांचा पक्षत्याग- सुप्रिया सुळे

आम्ही मुली वडिलांना कोणापुढे झुकू देणार नाही!

(संग्रहित छायाचित्र)

पुत्रप्रेमासाठी ७५ वर्षीय वडिलांना आपला विचार बदलावा लागतो आणि त्यांना आपल्यापेक्षा कमी वयाच्या माणसाला मुजरा करावा लागतो. वंशाचे दिवेच वडिलांना झुकायला लावत आहेत. परंतु आम्ही मुली वडिलांवर अशी वेळ येऊ देणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या मुलांवर टीका केली. तसेच नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे अजूनही पक्षात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने खासदार सुळे गुरुवारी ठाण्यात आल्या होत्या. या यात्रेदरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

सुळे म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत जे नेते पक्ष सोडून गेले, त्यांची नावे मोठी कशी झाली? या सर्वाना पक्षानेच मोठे केले. कुणाचेही नाव संघटनेमुळेच मोठे होते. स्वत:च्या ताकदीमुळे होत नाही. बहुतेक जण तीन ते चार कारणांमुळे पक्ष सोडत आहेत. त्यात चौकशी, बँका आणि कारखान्यांशी संबंधित बाबींचा समावेश आहे.’’

मुंबईत बलात्कार झालेल्या एका तरुणीचा औरंगाबादच्या रुग्णालयात मृत्यू झाला. ही तरुणी जालना जिल्ह्य़ातील होती. याच जिल्ह्य़ात मुख्यमंत्री फडणवीस यांची यात्रा सुरू असून त्यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. त्यावरूनच हे सरकार किती असंवेदनशील आहे, हेच दिसते, अशी टीका सुळे यांनी केली.

टोलमाफीसाठी आंदोलन..

शिवसेना आणि भाजपने निवडणुकीआधी ठाणेकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे टोलमुक्तीसाठी गणेशोत्सवानंतर आंदोलन करणार असून त्याचे नेतृत्व आपण करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:20 am

Web Title: abandon the party of leaders for son abn 97
Next Stories
1 जयस्वालांविरोधात अविश्वास ठराव?
2 बांधकाम क्षेत्रातील आव्हानांबाबत विचारमंथन
3 गणेशमूर्तीनाही पुराचा फटका
Just Now!
X