२३३ बालकांचा शोध अद्याप सुरूच

ठाण्यापासून बदलापूपर्यंत विस्तारलेल्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या दहा महिन्यांत तब्बल ८०३ बालकांचे अपहरण झाल्याची आकडेवारी उघड झाली आहे. या आकडेवारीचा विचार करता ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या शहरांतून दररोज सरासरी दोन ते तीन बालके बेपत्ता होत असल्याचे दिसून येते. अपहृत बालकांपैकी ५७० बालकांचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी झाले असले तरी, अद्याप २३३ बालके बेपत्ताच आहेत.

१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ८०३ बालकांचे अपहरण झाल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीतून समोर आलेले आहे. यातील ५७० बालकांचा शोध पोलिसांनी घेतला असला तरीही २३३ बालकांना शोधणे अद्यापही शक्य झालेले नाही. या २३३ बालकांमध्ये १७२ मुलींचा समावेश आहे. तर, २०१८ मधील जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत अपहरणाचा आकडा वाढलेलाच दिसून आला. २०१८ मध्ये तब्बल १ हजार २५ बालकांचे अपहरण झाले होते. यात ३६५ मुले तर, ६६० मुलींचा समावेश होता. यातील ९०५ बालकांचा शोध पोलिसांनी घेतला. मात्र, ८९ मुली आणि ३८ मुलांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

बालकांचे अपहरण केल्यानंतर बऱ्याच घटनांमध्ये अपहरणकर्त्यांकडून खंडणीसाठी पालकांशी संपर्क केला जात नाही. त्यामुळे तांत्रिक शोध घेणे पोलिसांना शक्य होत नाही. तर, १४ ते १७ वयोगटांतील अनेक मुली-मुले घरातून रागाने निघून गेल्यानंतर त्यांचा शोध घेणेही कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये जागृती

अपहरण प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत महिला व बालकल्याण विकास, शिक्षण विभागाच्या वतीने सर्वत्र बालकांची सुरक्षितता हा कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये बालकांचे हक्क, बालकांविरोधी अत्याचार याची माहिती देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.