चित्रकार, साहित्यिक आणि सामाजिक बांधिलकी म्हणून पाणीबचतीसाठी आपले जीवन वेचणारे मीरा रोडचे ऐंशी वर्षीय तरुण आबीद सुरती विविध प्रकराचे साहित्य वाचल्यानेच आपले विचार प्रगल्भ झाल्याचे सांगतात.

कायम थोर माणसे आजूबाजूला असल्याने बालपणापासूनच मला वाचनाची आवड व गोडी लागली. चित्र काढण्याची सवय अगदी शालेय जीवनापासूनच, या सवयीमुळेच वाचनाकडे वळलो. विविध भाषांतील साहित्याच्या वाचनाने आपल्या देशातील संस्कृती, रीतीरिवाज, जीवनशैली याची जवळून ओळख झाली आणि कूपमंडूक प्रवृत्तीत बाहेर पडून जगाकडे प्रगल्भ नजरेतून पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली.

वर्गात चित्र काढत बसलो असतानाच मित्राने मोठी चित्रं साकारणाऱ्या युसुफ धाला यांच्याकडे जाण्यास सुचवले. धाला यांच्याकडे चित्रपटासाठी लेखन करणाऱ्या मुश्ताक जलील यांची ओळख झाली. त्यांनी मला वाचण्याचा सल्ला दिला आणि मग हाती लागतील ती पुस्तके वाचण्याचा मी सपाटाच लावला. दरम्यानच्या काळात शालेय शिक्षण पूर्ण झाले. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे असेल तर स्वत: कमावण्याचा मार्ग शोधा असे घरून सांगण्यात आले. मुश्ताक जलील यांच्यामुळे चित्रपट सेटवर स्पॉट बॉयची नोकरी मिळाली. चित्रीकरणाच्या दोन शॉट्समध्ये भरपूर वेळ असल्याने या काळात देवदास कादंबरीचे लेखक आणि प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटर्जी यांच्या कादंबऱ्या वाचण्याचा सल्ला मुश्ताक यांच्याकडून मिळाल्याने चटर्जी यांची वविध पुस्तकेच संग्रही ठेवली व फावल्या वेळात वाचू लागलो. एक स्पॉटबॉय पुस्तके वाचतो याचे सर्वानाच नवल वाटू लागले. या आवडीमुळे स्पॉटबॉयपासून साहाय्यक दिग्दर्शक पदावर मला बढती मिळाली. वाचनाचा हा माझा पहिला फायदा आणि मग वाचनाचा सिलसिला सुरू झाला तो आजपर्यंत सुरूच आहे.

मराठीमधील वि.स.खांडेकर, पु.ल.देशपांडे, जयवंत दळवी यांच्या साहित्याचे विपुल वाचन केले. मराठी सुलभतेने वाचणे कठीण जात असल्याने त्याची भाषांतरे वाचली. दळवी यांच्याशी खास मैत्रीपूर्ण संबंध होते. दळवी यांच्या लेखणीत एक वेगळीच ताकद आहे. ‘माहीमची खाडी’ने मला चांगलेच प्रभावित केले. मराठी साहित्य वाचनासोबतच मराठी नाटकेदेखील खूप पाहिली. एक शून्य बाजीराव, तो मी नव्हेच, पु.ल.देशपांडे यांचे बटाटय़ाची चाळ या नाटकांचा आनंदही लुटलाच, शिवाय पु.लं.च्या विठ्ठल तो आला आला या नाटकाचे हिंदीत भाषांतर करून त्याचे प्रयोगही केले.

मराठी साहित्यासोबतच पंजाबी, हिंदी, इंग्रजी तसेच मातृभाषा असलेल्या गुजराती भाषेतील विपुल साहित्य मी वाचुन काढले. यातून भारतीय संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख झाली. वाचनाने विचार प्रगल्भ झाले, यातूनच लिखाणाची स्फूर्ती मिळत होती, परंतु दिशा मिळत नव्हती, महाविद्यालयीन जीवनातील एका प्रसंगाने चाचपडत असलेल्या मला लेखनाची वाट दाखवली. प्रेमभंगाने व्यथित झाल्यामुळे काहीच सुचत नव्हते. अबोल स्वभावाचा असल्याने मनातील खदखद बोलूनही दाखवता येत नव्हती. मग लेखणी उचलली आणि लिहायला सुरुवात केली. हृदयात साचलेले दु:ख कागदावर उतरले आणि जीव शांत झाला. कर्मधर्मसंयोगाने लिहिलेले कागद एका प्रकाशकाच्या हाती लागले आणि जन्म झाला टुटेले फरिश्ते या माझ्या पहिल्या कादंबरीचा.

आज माझ्या ८० कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दोन कादंबऱ्यांचे लेखन सुरू आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हाती घेतलेल्या पाणीबचतीच्या उपक्रमामुळे लिखाणाला वेळ मिळत नाही, परंतु तरीही लवकरच या कादंबऱ्या हातावेगळ्या करायच्या आहेत. चित्रपट लेखन, लहान मुलांच्या कॉमिक्सचे लेखन, चित्रकला या सगळ्यातून थोडा वेळ काढून आजही वाचन मात्र सुरूच ठेवले आहे.