कीर्ती केसरकर

पुरुष रिक्षाचालकांच्या त्रासामुळे बंद होण्याच्या मार्गावर

विरारमधील अबोली महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे या रिक्षा कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार होणारा त्रास, पोलिसांकडून होणारा छळ, खोटे गुन्हे, रिक्षांची नासधूस यांमुळे या महिला रिक्षाचालकांनी व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने शासनाने अबोली रिक्षाचालक योजना सुरू केली होती. विरारमध्ये सध्या १३ महिला रिक्षाचालक आहेत. मात्र त्यांना गेल्या काही महिन्यांपासून पुरुष रिक्षाचालकांकडून त्रास सुरू आहे. महिला रिक्षाचालकांना प्रवासी भरू न देणे, त्यांच्यावर दादागिरी, दमदाटी करणे, अश्लील शेरेबाजी करणे असे प्रकार सुरू होते. अनेक महिलांना पुरुष रिक्षाचालकांनी मारहाणही केली आहे. एका प्रकरणात विरार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला होता. पोलिसांनी बैठका घेतल्या होत्या. मात्र त्रास कमी न होता वाढू लागला. या महिला रिक्षाचालकांपैकी दर्शिका विसावाडिया या महिला रिक्षाचालकाने आवाज उठवून सर्वत्र तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुरुष रिक्षाचालक अधिकच संतापले आणि त्यांनी अनेक प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली.

पूर्वी कधी तरी त्यांचा रिक्षाची हवा काढली जायची तर कधी ब्लेड मारून रिक्षाचे आवरण फाडले जायचे. पण आता हे रोजचे झाले आहे. रिक्षाखाली खिळे ठेवून रिक्षा पंक्चर केली जाते. महिला रिक्षाचालकांच्या विरोधात पुरुष रिक्षाचालकांनी आंदोलनही केले आहे. वाहतूक पोलीसही महिला रिक्षाचालकांवरच कारवाई करीत आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न अबोली रिक्षाचालकांना पडला आहे.

पुरुष रिक्षाचालक रिक्षा थांब्यावर प्रवासी भरू देत नाहीत. म्हणून महिलांसाठी फुलपाडा येथे स्वतंत्र रिक्षाथांबा द्या, अशी मागणी महिला रिक्षाचालकांनी केली होती, परंतु तीही पूर्ण करण्यात आलेली नाही.

दर्शिका विसावाडिया यांच्या रिक्षाची नासधूस केल्याने रिक्षा बंद झाली आहे. इतर महिला रिक्षाचालकांनाही हाच त्रास होत आहे. रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणेही कठीण झाले आहे. यामुळे रिक्षा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय या महिला रिक्षाचालकांनी घेतला आहे.

आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही खूप त्रास सहन करीत आहोत. आता रिक्षा फोडण्यात आल्या. पोलीसही लक्ष देत नाहीत. त्यामुळे रिक्षा बंद करण्यावाचून पर्याय नाही. अन्यथा यापेक्षाही अधिक गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागेल.

– दर्शिका विसावाडिया, अबोली रिक्षाचालक

महिला रिक्षाचालकांची तक्रार आल्यानंतर लगेच कारवाई केली. महिलांना मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हाही दाखल केला आणि अटकही केली होती. वेळोवेळी कारवाई करत असतो. या प्रकरणात पोलिसांनी कुठलाही हलगर्जीपणा केला नाही.

– जयंत बजबळे, पोलीस उपअधीक्षक, विरार