अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांच्या अंतर्गत असलेल्या शाळा पूर्वीच्याच जिल्हा परिषद शाळांच्या रूपात सुधारणा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या शाळा इमारती उभ्या असल्या तरी प्रशासकीय पातळीवर या शाळांना वैभव प्राप्त करून देण्यासाठी हालचाली होणे आता अपेक्षित आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिका व अंबरनाथ नगरपालिका यांच्याकडे जिल्हा परिषदेकडून शाळा या हस्तांतरित होऊन आल्या आहेत. या दोन्ही पालिकांमध्ये या शाळा चालविण्यासाठी शिक्षण मंडळाची स्थापना झाली असून याबरोबरच येथे पालिकेच्या अन्य समित्यांसोबत शिक्षण समितीही आहे. म्हणजेच, शिक्षण मंडळ व शिक्षण समिती यांमार्फत या शाळांचा कारभार चालतो. अंबरनाथमधील शाळांच्या इमारतींची सध्या दुरवस्था असून येथे बहुतेक शाळांना दुरुस्ती व डागडुजीची गरज आहे. गेल्या महिन्यात १५ मे रोजी पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाला दुरुस्ती करण्यासंदर्भातला अहवाल पाठवला आहे. अद्यापि बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई मात्र केलेली नाही. आता पुन्हा स्मरणपत्र पाठवून बांधकाम विभागाला याची आठवण करून देण्यात येणार आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण मंडळाचा समावेश नसून शिक्षण मंडळाला देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्याबाबत ऑडिट हरकत आल्याने हा मुद्दा समोर आला आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांच्या पगाराची २० टक्के रक्कम अद्यापि रखडली आहे. पगाराची ८० टक्के रक्कम राज्य शासनाकडून व उर्वरित २० टक्के रक्कम नगरपालिकेच्या वतीने देण्यात येते. मात्र या २० टक्के रकमेचा पालिकेच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलेला नाही.
बदलापुरातील पालिका शाळांमध्ये नवे प्रयोग
बदलापूर पालिकेकडे या शाळा जिल्हा परिषदेकडून २००८ मध्ये वर्ग झाल्या असून या वर्षीपासूनच येथे शिक्षण मंडळ अस्तित्वात आले असले तरी तेव्हापासून आजपर्यंत शासनाने येथे शिक्षण मंडळावर प्रशासकीय अधिकारी नेमलेला नाही. त्यामुळे पालिकेचे अधिकारीच हा सगळा कारभार नेटाने पाहत आहेत. पालिकेच्या काही शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट असून विजेचा प्रश्नही काही शाळांमध्ये आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून येथील मोठय़ा शाळांमध्ये चांगले उपक्रम सुरू झाले असून शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व तत्सम १६ परीक्षा यंदापासून या शाळांमध्ये सुरू होत आहेत. याचबरोबरीने पाढे पाठांतर स्पर्धा, भित्तिचित्रे काढणे स्पर्धा आदी वेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, येथील सर्वात मोठय़ा कुळगाव शाळेत ८ वीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यास येथे लवकरच ८ वीचे वर्ग चालू होण्याचीही शक्यता आहे. येथील मोहपाडा शाळा ही एका वाडीवर असून येथे १६ विद्यार्थी आहेत. त्यामुळे या वाडीतील इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी या हेतूने ही ई-लर्निग शाळा करण्याचा पालिकेचा मानस आहे. दरम्यान, बदलापूर पालिकेतील या शाळांची पटसंख्या कमी असून येथे शिक्षकांची संख्यादेखील कमी आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढविण्याची या शाळांना आवश्यकता असली तरी, प्रथम येथे शिक्षकही वाढणे अपेक्षित आहेत. हेच वाढलेले शिक्षक भविष्यात पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहतील.