सह्य़ाद्री पर्वताच्या माथेरान आणि श्रीमलंग डोंगर रांगांमधून विविध प्रवाहांद्वारे कल्याण खाडीला मिळणारी वालधुनी नदी अगदी ८०च्या दशकापर्यंत शुद्ध पाण्याचा बारमाही स्रोत होती.मुंबई परिसरातील रेल्वे मार्ग उभारण्याचे काम करणाऱ्या ग्रेट इंडियन पेनेन्सुला कंपनीने कल्याण स्थानकास पाणीपुरवठा करण्यासाठी या नदीवर काकोळे येथे धरण बांधले. नव्वदच्या दशकापर्यंत कल्याणच्या रेल्वे वसाहतीला या धरणातून पाणीपुरवठा होत होता. मध्यंतरीच्या काळात वापराविना पडून असलेल्या या धरणाच्या काठी दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने बाटलीबंद पाण्याचा रेलनीर प्रकल्प उभारला आहे. मात्र, पुढील काळात ही नदी वाढत्या नागरीकरणाची बळी ठरली. अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण येथील औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी थेट प्रवाहात सोडले जात असल्याने वालधुनीचा प्रवाह कमालीचा प्रदूषित झाला. दुसरीकडे वाढत्या अतिक्रमणांमुळे वालधुनीचे पात्र आक्रसून गेले. अर्निबध शहरीकरणाने बळी घेतलेल्या या नदीची आठवण शासनाला सर्वप्रथम २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत झाली. मुंबईतील मिठी नदीप्रमाणेच वालधुनीचेही संवर्धन करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. प्रत्यक्षात कागदी अहवाल, वरवरचे सर्वेक्षण आणि घोषणाबाजीच्या पलीकडे काहीही झाले नाही. दरम्यान केवळ स्थानिकच नव्हे तर दूरवरच्या अगदी वापी परिसरातील औद्योगिक कारखान्यांचे दूषित रासायनिक सांडपाण्याचे टँकर वालधुनीच्या नाल्यात रात्री गुपचूप रिकामे केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधील वडोळ गावात दोन वर्षांपूर्वी उघडकीस आला. शासनाच्या पर्यावरण विभागाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. प्रत्यक्षात त्या सर्व घोषणा पोकळ ठरल्या. सध्या तिची अवस्था एका विशाल नाल्यासारखी करून ठेवली आहे. वालधुनीच्या व्यथेची ही कहाणी..

वालधुनी नदीविषयी..
माथेरान-मलंगगड डोंगर रांगांवरील ताहुली डोंगरावर वालधुनी नदीचा उगम होतो. तेथून वेगवेगळ्या ओढय़ातून ती जीआयपी टँक धरणात पोहचत तेथून वालधुनीचा मुख्यप्रवाह पुढे सरकतो. ही नदी पुढे उल्हासनदीत जाऊन विलीन होते. इ.स.१०३०च्या सुमारास वालधुनीच्या परिसरामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी तत्कालीन शिलाहार राज्यकर्त्यांनी कृत्रिमरीत्या या नदीचे पात्र खोदले, असे मत काही अभ्यासकांनी नोंदवले आहे. याच नदीच्या काठी शिलाहार राजा माम्वाणी याने इ.स. १०६० मध्ये अप्रतिम कलाकुसरीचा उत्तम नमुना असणारे शिवमंदिर उभारले. युनोस्कोने जाहीर केलेल्या जगभरातील मोजक्या ऐतिहासिक वारशांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. १९७० ते ८० च्या दशकापर्यंत वालधुनी नदीत बाराही महिने पाण्याने वाहत होती. त्यानंतर या नदीचे एका मोठय़ा सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाले आहे.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

एकूण लांबी: वालधुनी नदीची एकूण लांबी ११ हजार ७०० मीटर असून त्यापैकी ३ हजार ६०० मीटर लांबी ही कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात येते आहे. उल्हासनगर हद्दीतून १ हजार २०० मीटर लांबीची वालधुनी वाहते. वालधुनी नदीवर १ रेल्वे पूल आणि रस्ते वाहतुकीसाठी दोन पूल आहेत.
’ मार्ग : ताहुली डोंगररांगांवरून अंबरनाथ शहरात दाखल होणारी नदी पुढे उल्हासनगरातून कल्याण शहरात पोहचते. कल्याणमधील मोहने पुलाजवळ वालधुनी उल्हासनदीमध्ये पोहचते.

वालधुनी नदीला चिखलोली धरणातून येणारा प्रवाह अंबरनाथ शहराजवळ मिळतो. पुढे विठ्ठलवाडी स्थानकाजवळ कल्याण पूर्वेतून येणारा आणखी एक मोठा प्रवाह वालधुनी नदीमध्ये विलीन होतो. या दोन्ही प्रवाहांना वालधुनी नदी अशीच ओळख असून मूळ नदीप्रमाणे या उपप्रवाहांचे पाणीसुद्धा प्रदूषित अवस्थेत आहे.

उगमापासूनच प्रदूषणाला सुरुवात
माहुली डोंगरावरून वाहणाऱ्या वालधुनीच्या प्रवाहालगतची अगदी पहिली मानवी वस्ती म्हणजे धनगरवाडी. मात्र नाव धनगरवाडी असले तरी ५५ घरांच्या या आदिवासी वस्तीत सर्वजण ठाकर समाजाचे लोक आहेत. वस्तीच्या खालच्या बाजूने वाहणारा वालधुनीचा प्रवाह पुढे काकोळे तलाव म्हणजेच जी.आय.पी. धरणाला मिळतो. उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे होते, पण ग्रामस्थांनी नदीपात्राजवळ खोदलेल्या विहिरींना मात्र बारमाही पाणी असते. उन्हाळ्यात मात्र विहिरी तळाला जाऊन वस्तीतल्या लोकांना भयंकर पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वालधुनीचे पाणी पिण्यासाठी वापरणारी सध्या अस्तित्वात असलेली ही एकमेव वस्ती आहे. धनगरवाडीच्या खालच्या भागात बोहोणोली गाव आहे. या गावात वालधुनीच्या प्रवाहात रोटरी क्लबने बांधलेला काँक्रीट बंधाराही आता गाळाने भरला असून त्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. तरीही बंधाऱ्यांमुळे काही प्रमाणात अडलेल्या पाण्याचा वापर ग्रामस्थ कपडे धुणे, भांडी घासणे आदी कारणांसाठी करतात. परिसरातील काही शेतकरी या पाण्यावर भाजीपालाही पिकवितात. एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईच्या काळात पात्रात खड्डे खोदून त्यातले पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर येते.
आतापर्यंत अतिरिक्त अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी काकोळे तलावाच्या पुढील बाजूस नाल्यात सोडले जात होते. मात्र आता आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी काकोळे तलावाच्या पलीकडेही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीने एका कंपनीला दिलेल्या ५० एकर जागेतूनच वालधुनीचा प्रवाह आहे. कंपनीला भूखंड देताना कंपनीने नदीसंदर्भातल्या पर्यावरणीय निकषांचे उघड उघड उल्लंघन केले आहे. आपल्या जागेभोवती कुंपण घालताना कंपनीने नदीचे पात्रच अडविले आहे.

धरणांचा जलस्रोत शुद्ध राखण्याचे आव्हान
खरेतर धरणांच्या पलीकडे वाहणाऱ्या वालधुनीचे पुनरुज्जीवन करणे विशेष प्रयत्नांशिवाय अशक्य झाले आहे. त्याच वेळी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरसुद्धा आता प्रदूषणाचे मळभ दाटून आले आहेत. आनंदनगर औद्योगिकीकरणाच्या विस्तारीकरणाने आता जी.आय.पी. धरणाचा नैसर्गिक जलस्रोत अडविला आहे. भविष्यात येथील कंपन्यांचे सांडपाणीही याच नाल्यात सोडले जाण्याची भीती आहे. अत्यंत अपुरा पाणीसाठा आणि वाढती लोकसंख्या यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील नागरी वस्त्यांपुढे मोठे जलसंकट निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर वालधुनी बचाव मोहीम आता जी.आय.पी. धरणाच्या पलीकडे राबवावी लागणार आहे. अन्यथा नदी तर हातची गेलीच, पण आता धरणामुळे राखले गेलेले तळेही गमावून बसण्याची वेळ येईल.