सार्वजनिक स्वच्छतागृह ही एक मोठी गरज असते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना, बाजारपेठ विभागातील विक्रेते, व्यापाऱ्यांना अशी स्वच्छतागृहे आवश्यक असतात. अन्यथा, एखादा आडोसा, इमारतीचा कोपरा नाहक घाण केला जातो. तो परिसर अस्वच्छता, दरुगधीचे आगर होऊन जाते. कल्याण, डोंबिवलीतील सध्याची परिस्थिती तीच आहे. शहरातील लोकवस्ती असलेल्या भागात अडीच ते तीन हजार स्वच्छतागृहे पालिका, एमएमआरडीएच्या सहभागातून मागील सात वर्षांपूर्वी बांधण्यात आली. तेथील चाळी, झोपडीवासीय यांची चांगली सोय झाली.

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रस्ते, बाजारपेठा, नाका कामगार उभी राहण्याची ठिकाणे, भाजीबाजार, घाऊक बाजार अशा ठिकाणी ही स्वच्छतागृहे अभावाने आहेत. पालिकेच्या काळात यापूर्वी बांधलेली मोडकी, तोडकी, गळकी स्वच्छतागृहे आहे त्या परिस्थितीत वापरली जात आहेत. त्यामध्ये कोणतीही सुधारणा केली जात नाही. विशेष म्हणजे कल्याणमध्ये मुरबाड रस्ता, पत्रीपूल ते शिवाजी चौक मार्गे, दुर्गाडी रस्ता, आधारवाडी रस्ता, संतोषीमाता रस्ता, बिर्ला महाविद्यालय ते आधारवाडी रस्ता, पूर्व भागात नेतिवली, पिसवली, काटेमानिवली भागातील रस्त्यांवर एकही स्वच्छतागृह नाही. जुन्यापुराण्या प्रसाधनगृहांचा आधार घेऊन लोक आपला कार्यभाग उरकतात.
महापालिका केवळ गटारे, पायवाटांवर दरवर्षी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च करते. त्या पालिकेने नगरसेवकांच्या सूचनांची वाट न पाहता स्वत:हून नागरिकांची गरज म्हणून रेल्वे स्थानक, शहरातील मुख्य रस्ते भागात स्वच्छतागृह बांधण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची अडचण होते. महिलांसाठी तर रेल्वे स्थानक भागात एकही स्वच्छतागृह नाही. रेल्वेची, पालिकेची स्वच्छतागृहे आहेत. तेथे गर्दुल्ले, मद्यपी यांचा राबता असतो.
कल्याण, डोंबिवली शहरातील हे भीषण वास्तव आहे. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, आमदार या गंभीर विषयावर बोलणार नाहीत. कारण त्यांना अशा कामांमधून भरपूर मते किंवा लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे एक महत्त्वाचा गंभीर विषय दुर्लक्षित झाला आहे. सुंदर नगरी करताना आणि पंधराशे कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेला एक अत्यावश्यक स्वच्छतागृहाची सुविधा देता येत नाही. पालिका निवडणुकीच्या तोंडावर महिला बालकल्याण विभागाने महिलांसाठी रेडीमेड स्वच्छतागृहाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु एकदा टक्केवारी पदरात पडली, निवडणुका झाल्या की हा महत्त्वाचा विषय पुन्हा अडगळीत पडणार आहे. हेच आतापर्यंत होत आले.

परदेशात े नागरिकांच्या गरजेप्रमाणे सार्वजनिक सुविधा देण्यात येतात. घरातून बाहेर पडल्यानंतर महत्वाच्या, वर्दळीच्या ठिकाणी प्रसाधनगृह असलीच पाहिजेत. तसा प्रकार कल्याण डोंबिवलीत दिसत नाही. शहर बकाल, घाणेरडे होण्याचे ते एक महत्वाचे कारण आहे.
-राहुल जगताप, कल्याण

पालिकेने शहराची प्राथमिक गरज ओळखून गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्थानक, रिक्षा वाहनतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधून द्यावीत. नगरसेवकांनी गटारे, पायवाटांमध्ये सारखा खर्च करणे बंद करून जनतेची गरज ओळखून सुविधा द्याव्यात.
-निनाद वैशंपायन, कल्याण