ठाण्याची वेस ओलांडून मुंबईत प्रवेश करताना प्रवाशांसाठी वातानुकूलित व्होल्वो बसेसची व्यवस्था करणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या तिजोरीतील खडखडाट आता या सेवेवर विपरित परिणाम घडवू लागला आहे. या व्होल्वो बसेसच्या देखभाल, दुरुस्तीसाठी कंपनीकडून नेमण्यात आलेल्या तंत्रज्ञांचे तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने त्यांनी या कामाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या अत्याधुनिक बसगाडय़ांचा साधा आरसा बसवतानाही ‘टीएमटी’मधील कारागिरांना घाम फुटू लागला आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमात केंद्र सरकारच्या मदतीने साडेतीन महिन्यांपूर्वी व्होल्वो कंपनीच्या १५ वातानुकूलित बसेस दाखल झाल्या. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन टीएमटीने मुंबईतील विविध मार्गावर या गाडय़ा चालवण्यास सुरुवात केली. ठाणे परिवहन उपक्रमाच्या नीळकंठ आगारात या वातानुकूलित गाडय़ा उभ्या केल्या जातात. ९५ लाख रुपये किमतीच्या या महागडय़ा बसेसची देखभाल करण्यासाठी वसई येथील ‘इम्प्रो मूव्ह’ कंपनीचे दोन तंत्रज्ञ तीन महिन्यांपासून नीळकंठ आगारात कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वीच परिवहन प्रशासनाने कंपनीशी करार केला होता. त्यामुळे कराराप्रमाणे या तंत्रज्ञांना वेतन देणे बंधनकारक होते. मात्र कंपनीशी कराराची प्रक्रिया पूर्ण होऊनही तंत्रज्ञांना पगार दिला जात नसल्याने संबंधित कंपनीने या दोघा तंत्रज्ञांना माघारी बोलावले आहे.  
या घडामोडींनंतर व्होल्वो बसची देखभाल व दुरुस्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात ‘इम्प्रो मूव्ह’ कंपनीच्या दोन तंत्रज्ञांनी बसगाडय़ांची योग्य ती काळजी घेतली. त्यामुळे या बसेस सुस्थितीत धावत होत्या. बसगाडय़ांमध्ये काही बिघाड झाल्यास अवघ्या दोन ते तीन तासात हे तंत्रज्ञ बसगाडी दुरुस्त करून मार्गी लावत होते. ठाणे परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना या वातानुकूलित बसेसच्या दुरुस्तीचे योग्य प्रशिक्षण नाही. त्यामुळे साधा आरसा कसा बदलायचा असा प्रश्नही त्यांना पडतो. उन्हाळ्याच्या दिवसात या गाडय़ा गरम झाल्यास, रस्त्यात बंद पडल्यास या तंत्रज्ञांची गरज भासत आहे.  

संबंधित कंपनीसोबत वार्षिक देखभाल-दुरुस्ती करारास मान्यता मिळाली आहे. मात्र दरासंबंधी फेरविचार सुरू आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करार होईल की नाही अशी भीती असल्याने त्यांनी काम बंद केले आहे. या संदर्भात कंपनीला विनंतीपत्र पाठवून या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर पाठविण्याची मागणी ठाणे परिवहन प्रशासनाने केली आहे.  
– देवीदास टेकाळे,
व्यवस्थापक ठाणे परिवहन सेवा