रायगड जिल्ह्य़ातील पेण परिसरातील बाळगंगा नदीवरील धरण गैरव्यवहार प्रकरणी जलसंपदा विभागातील सहा अधिकारी, कंत्राटदार व त्याचे चार भागीदार अशा ११ जणांविरुद्ध मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या सर्वानी धरणाच्या कामाच्या खर्चात वाढ करून शासनाचे तब्बल ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात पुढे आली आहे. बाळगंगाप्रमाणेच ठाणे जिल्ह्य़ातील शाई आणि काळू या प्रस्तावित धरण प्रकल्पांमध्येही मोठय़ा प्रमाणात तक्रारी असून त्याचे कामही याच कंत्राटदाराकडे आहे.
या अकरा आरोपींमध्ये कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीष गोपाळराव बाबर, कोकण प्रदेशचे तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब भाऊसाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र दगडू शिंदे, रायगड पाटबंधारे (विभाग १, कोलाड)चे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा पांडुरंग काळुखे, याच विभागाचे तत्कालीन उपअभियंता राजेश चंद्रकांत रिठे तसेच तत्कालीन शाखा अभियंता विजय रघुनाथ कासट तर एफ. ए. कन्स्ट्रक्शन आणि एफ. ए. इंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहमद अब्दुला खत्री, निसार फतेह मोहमद खत्री, जैतुन फतेह मोहमद खत्री, अबीद फतेह मोहमद खत्री आणि जाहीद फतेह मोहमद खत्री यांचा समावेश आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले होते.