|| मयूर ठाकूर

प्रवेशद्वारावर बायोमॅट्रिक यंत्रणा असल्याने नागरिकांची गैरसोय :- नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधीत असेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या नगरविकास कार्यालयातच नागरिकांना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आठवडय़ातील दोन दिवस वगळता या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांनी फिरकू नये यासाठी बायोमॅट्रिक यंत्रणा असलेले प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आतमध्ये जाता येत नाही. परंतु बिल्डर, व्यावसायिक आदींना मात्र कधीही प्रवेश मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे होत असून नवनवीन इमारती आणि वसाहती उभ्या राहात आहेत. यासाठी नगररनचा विभागाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. पालिकेच्या मुख्यालयात असेलला नगररचना विभाग २०१६मध्ये मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्क परिसरात हलवण्यात आला. या नगररचना विभागामध्ये २३ कर्मचारी कार्यरत आहेत. नगररचना विभागातून शहरातील इमारती संबंधित कामकाज पार पाडले जाते. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी या नगररचना विभागात येऊ नये याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आठवडय़ातील दोन दिवस केवळ मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ११ ते १.३० हा कालावधी ठरवण्यात आला आहे. इतर वेळी नागरिकांनी येऊ नये यासाठी प्रवेशद्वारावर बायोमॅट्रिक यंत्रणा लावण्यात आलेली आहे. हे प्रवेशद्वार केवळ सुरक्षारक्षकाकडे असलेल्या कार्डाद्वारेच उघडले जाते.  त्यामुळे इतर वेळी सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयात जाता येत नाही. एरवी जायचे असेल तर नगरविकास खात्यामधील अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांनी सुरक्षारक्षकाला सुचना दिल्यानंतरच हे प्रवेशद्वार उघडले जाते. सर्वसामान्य व्यक्तींचा अधिकाऱ्यांशी संपर्क नसतो. त्यामुळे त्यांना कार्यालयात जाता येत नाही. तर दुसरीकडे बडे व्यावसायिक, बिल्डर तसेच धनदांडगे यांचा मात्र नगरविकास कार्यालयात राबता असतो. सामान्य नागरिकांना  प्रशासनापासून लांब ठेवण्याकरिता तसेच गुप्त पद्धतीने कामकाज करण्याकरिता हे कुलूप लावण्यात आल्याचा आरोप प्रवीण परमार या नागरिकाने केला आहे.

अशाप्रकारे प्रतिबंध घातला जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा काही महत्त्वाच्या कामांसाठी नागरिक इतर दिवशीही कार्यालयाला भेट देत असतात. अश्या परिस्थितीत सामान्य नागरिकांना प्रवेश न देता काही ठराविक व्यक्तींना अधिकारी कोणत्याही क्षणी भेटत असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

आयुक्तांकडून समर्थन

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांनी मात्र याचे समर्थन केले आहे. ठाणे कार्यालयातही अशी पद्धत गेल्या १० वर्षांपासून आहे. उत्तम काम करण्यासाठी हे आवश्यक आहे. .तरी  काही गैरव्यवहार होत असतील तर संबंधित अधिकारम्य़ाला  गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश देण्यात येतील, असे मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितले.