28 January 2021

News Flash

अपघातांना ‘ग्रीन सिग्नल’

या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे चौकातून येणाऱ्या भरधाव वाहनांचे अपघात होत आहेत.

ठाण्यातील नितीन कंपनी चौकात सिग्नल यंत्रणा नसल्याने ६ वर्षांत ३८ दुर्घटना

ठाण्यातील सर्वाधिक गर्दीचा चौक असलेल्या नितीन कंपनी चौकामध्ये सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे मनमानी पद्धतीने वाहतूक होत असून या परिसरात  २०१० ते २०१६ या कालावधीत ३८ हून अधिक अपघात झाल्याची माहिती उघड झाली आहे. पोलीस यंत्रणेकडे इतक्या अपघातांची माहिती असली तरी या भागात नोंदवल्या जात नसलेल्या अपघातांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेने येणारी वाहने या ठिकाणी येत असतानाही या भागात सिग्नल नसल्यामुळे या ठिकाणी अपघातांना ‘ग्रीन सिग्नल’ मिळत असल्यासारखी परिस्थिती आहे.

ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर नितीन कंपनी येथील चौकामध्ये शहरातील चारही दिशेने मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. मात्र या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे चौकातून येणाऱ्या भरधाव वाहनांचे अपघात होत आहेत. वाहनांच्या अपघातांबरोबरच वाहनांची धडक लागून पादचारी जखमी होण्याचे प्रमाणही या भागात आढळून येते. मुख्य रस्ते आणि सेवा रस्त्यांसह अन्य रस्तेही येथे एकत्र येतात. त्यामुळे वाहतुकीचा कोंडाळा या भागात होत असतो. शिवाय सिग्नल नसल्याने कुणी, कुठे आणि कधी जायचे याचेही काही तंत्र नसते. या भागात वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी नसताना येथे वाहतुकीचा बोजवारा उडतो.

या महामार्गावर गेल्या सहा वर्षांमध्ये ३८ अपघातांची नोंद झाली आहे. १९ वाहनांचे अपघात झाले असून वाहनांच्या धडकेत १९ नागरिक जखमी झाल्याची नोंद वाहतूक पोलिसांकडे आहे. या भागामध्ये महापालिकेच्या वतीने भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिक या भागात भुयारी मार्गाचा वापरच करीत नसल्याने संकट अधिक वाढले आहे. यापूर्वी या भागामध्ये सिग्नल यंत्रणा अस्तित्वात होती. मात्र वर्तुळाकार वाहतूक करण्याच्या प्रयोगामुळे हा सिग्नल हटवण्यात आला होता. तो पूर्ववत बसवला नसल्यामुळे या भागात अपघात होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:15 am

Web Title: accident cases in thane nitin company chowk
Next Stories
1 अग्निशमन सेवेत सहा दुचाकी दाखल
2 मिरवणाऱ्या ‘नामधारी’ वाहनांच्या संख्येत वाढ
3 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी समृद्ध झाले..
Just Now!
X