रस्त्याच्या मधोमध विजेच्या खांबाला ट्रकची धडक; कडोंमपाची ढिलाई

रस्ता रुंदीकरणात कडेला असलेले विजेचे खांब मधोमध येतील याची कल्पना असतानाही ते काढून टाकण्याऐवजी एखादा अपघात होईपर्यंत थांबण्याची पालिकेची ‘पद्धत’ यशस्वी ठरली आहे. कल्याण पूर्वेतील चेतना विद्यालय ते नेवाळी रस्त्याच्या रुंदीकरणात रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबाला एका भरधाव ट्रकने गुरुवारी धडक दिली. यात विजेचा तो खांब वाकला. त्यामुळे कामातील पालिकेच्या ढिलाईची चर्चा सध्या रंगली आहे.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणी पेट्रोल पंप आहेत. नामांकित शाळा या भागात आहेत. चेतना विद्यालय ते नेवाळी रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते. विशेष करून शाळेच्या बस येथून ये-जा करतात. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वस्ती आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्या रस्ते बांधकाम विभागाने आठ महिन्यांपूर्वी पूर्ण केले. हे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने या रस्त्यावर असलेले तब्बल ९० विजेच्या खांबांचे स्थलांतर करणे अपेक्षित होते. याशिवाय याच ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याची कामे महापालिकेच्या विद्युत विभागाला करायची आहेत. महावितरणने वीज खांबांचे स्थलांतर आणि इतर विद्युत कामांना पालिकेला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे. असे असताना हे काम करण्यात दिरंगाई केली जात आहे. मलंगगड रस्त्यावरून मुंबई, मलंग, बदलापूर, कर्जत, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते.रस्त्याच्या मधोमध विजेचा खांब असल्याने  रस्त्यावर भीषण अपघात होण्याची भीती येथील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी आयुक्त गोविंद बोडके, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

पैशांची उधळपट्टी

या भागातील काही रहिवाशांनी महापालिकेकडे या रस्त्यावर मध्यभागी असलेले विजेचे खांब हटविण्याची मागणी केली आहे. मात्र, विद्युत विभागाकडून या महत्त्वाच्या कामाकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याने रहिवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्यामधील विजेचा खांब पडून मोठी दुर्घटना झाल्यानंतर पालिका वीज खांब स्थलांतराचे काम हाती घेणार का, असे उद्विग्न होऊन रहिवासी प्रश्न करीत आहेत. महापालिकेने आता रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. हे डांबरीकरण विजेचे खांब स्थलांतरण व इतर कामांसाठी खोदावे लागणार आहे. काही ठिकाणी पाइप टाकून वाहिन्या खेचाव्या लागणार आहेत. हे माहिती असूनही विद्युत आणि शहर अभियंता विभाग, रस्ते प्रकल्प विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नियोजन करून कामे न करता पैशांची अनावश्यक उधळपट्टी केली जात आहे.