डोंबिवलीतील तीन हजार प्रवाशांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

भगवान मंडलिक, डोंबिवली

दररोज सकाळी कल्याण-डोंबिवली स्थानकांतून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी होत असताना, याच वेळेत सोडण्यात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांमुळे वेळापत्रकावर परिणाम होतो. तसेच त्यामुळे गर्दीत भर पडते व त्यातून अपघात घडतात, असा दावा डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशांनी केला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांची ही ‘घुसखोरी’ रोखण्यासाठी सुमारे तीन हजार प्रवाशांच्या स्वाक्षरीचे पत्र रेल्वेमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

मुंबई, नवी मुंबई, वसई, डहाणू परिसरातील कार्यालयांमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी डोंबिवली भागातील चाकरमानी सकाळी सात ते आठ या वेळेत रेल्वेने प्रवास सुरू करतात. डोंबिवली रेल्वे स्थानकातून सकाळी ७ वाजून २० मिनिटे ते ८ वाजून १५ मिनिटे या कालावधीत मुंबई ‘सीएमएसटी’कडे जाणाऱ्या बहुतांश लोकल या अति जलद प्रकारात मोडणाऱ्या आहेत.कोणतीही तांत्रिक अडचण नसेल तर या लोकल गाडय़ा शेवटच्या स्थानकात ५५ मिनिटांमध्ये पोहोचतात. या वेळेतील लोकल मिळावी यासाठी चाकरमान्यांची धडपड असते. या धडपडीत लोकल मिळाली नाही तर प्रवासी जिवाची बाजी लावत लोंबकळत प्रवास सुरू करतात. सकाळी ७.२० ते ८.१५ या वेळेत लोकल पकडण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी असते.

नेमक्या याच वेळेत मध्य रेल्वे त्यांच्या नियोजित वेळेतील लांब पल्ल्याच्या बाहेरून येणाऱ्या गाडय़ा कुर्ला, सीएसएमटीच्या दिशेने सोडते. या एक्स्प्रेस गाडय़ा मुंबईच्या दिशेने रवाना होत नाहीत, तोपर्यंत जलदगती लोकल मुंबईच्या दिशेने कल्याणहून सोडल्या जात नाहीत. त्यामुळे हा प्रवास प्रवाशांच्या जिवावर बेतू लागला आहे, अशी सविस्तर माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. गर्दीच्या वेळेत नियमित प्रवास करणारे प्रवासी श्रीकांत खुपेरकर यांनी या निवेदन आणि स्वाक्षरी मोहिमेसाठी पुढाकार घेतला. रेल्वे मंत्रालयाने सकाळच्या सात ते १० वेळेत पुणे, नाशिककडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा सीएसएमटी, कुर्ला या ठिकाणी सोडल्या नाहीत तर लोकल उशिरा धावण्याचा प्रकार पूर्णपणे थांबेल, अशी भूमिका या पत्रात मांडण्यात आली आहे.

डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून प्रवासी पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. जे नियमित लोकलने सकाळच्या वेळेत प्रवास करतात त्यांना या मृत्यूचे कारण माहिती आहे. या मृत्यूचे कारण काय आहे, त्याविषयी रेल्वे मंत्रालयाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या विचारातून रेल्वेमंत्री, वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात येत आहे.

-श्रीकांत खुपेरकर, रेल्वे प्रवासी

डोंबिवलीतून विशेष लोकल सोडण्याची मागणी

डोंबिवली रेल्वे स्थानकातून दरवर्षी दोन लाख ६४ हजार प्रवासी प्रवास करतात. वाढत्या नागरीकरणामुळे या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हा विचार करून डोंबिवली रेल्वे स्थानकातून सकाळी सात ते १० या वेळेत मुंबई दिशेने जलद, अति जलद लोकल सोडाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ म्हात्रे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. कपिल पाटील यांच्याकडे केली आहे. डोंबिवली स्थानकातून एकूण ४० लोकल सुरू करा. यामध्ये १५ गाडय़ा अति जलद आणि २५ गाडय़ा धिम्या गतीने सोडा, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.