काँक्रिटीकरणातील हलगर्जीमुळे आणखी एक अपघात
बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या आणि काँक्रिटीकरणाच्या कामात बाळगण्यात येत असलेल्या हलगर्जीपणामुळे आणखी एक अपघात ओढवला असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बदलापूर शहरात सध्या विविध भागांमध्ये रस्ते रुंदीकरण तसेच काँक्रिटीकरणाचे काम मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. फॉरेस्ट नाका ते एमआयडीसी होप इंडियापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कामासाठी शहरातील विविध भागांमध्ये काँक्रिटीकरणासाठी रस्ते खोदण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या पश्मिच भागातील प्रवेशद्वारापासून ते थेट उड्डाणपुलापर्यंत रस्त्याचा एक भाग खोदण्यात आला आहे. त्यामुळे एकरी रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. मध्यंतरी दत्त चौक परिसरात वळणावर यापूर्वी खोदलेला रस्ता आणि मूळ रस्ता यातील उंचसखल भागामुळे एक चारचाकी अडकून पडली होती. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने वाहतूक कमी होती, त्यामुळे मोठा अपघात टळला. मात्र त्या वेळीही वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर रस्त्यांच्या कामांविषयी विशेष काळजी घेणे गरजेचे होते, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे बुधवारी रात्री पुन्हा याच ठिकाणी एक अपघात घडला. अंबरनाथकडे जाणारी निसान टोरंडो गाडीच्या चालकास पावसामुळे नीट रस्ता दिसला नाही, त्यामुळे वाहन खोदलेल्या ठिकाणी घसरले. चालकाच्या गाडीवर कसेबसे नियंत्रण मिळविल्याने याठिकाणी मोठा अपघात टळला. वारंवार मागणी करूनही सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने कंत्राटदारावर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवालही आता उपस्थित होतो आहे. यापूर्वीही शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडी आणि धुळीच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

माहितीच्या अभावामुळे प्रवाशांचा गोंधळ
रस्त्यांची कामे सुरू असूनही पुरेशा प्रमाणात मार्ग बदल न केल्याने नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. भरदिवसा अध्र्या रस्त्यावर टँकर उभे करून रस्त्यांना पाणी दिले जात असल्याने नागरिक आणि कंत्राटदारांतील वाद टोकाला पोहचले आहेत. रस्त्याचे काम, त्याची माहिती, त्यासाठीचा कालावधी अशी कोणतीही माहिती कुठेही प्रदर्शित करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात भर पडत आहे.