वसईत महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले; गेल्या वर्षभरात १२० प्रवाशांचा बळी
मृंबई-अहमदाबाद महामार्ग वसई पट्टय़ात अत्यंत धोकादायक बनला आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर वसईजवळ तब्बल १२० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे हा महामार्ग आहे की मृत्यूमार्ग, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात वाहनचालक सुसाट वेगाने वाहन हाकत असल्यानेच अपघात होत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हा वसईतून जातो. वसई तालुक्यात वाघोबा खिंड ते वर्सोवा पुलापर्यंतचा परिसर त्यात येतो, परंतु वाहनचालकांसाठी हा महामार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. २०१५ या वर्षांत या ठिकाणी ११२ अपघात घडले. त्यात १२० जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर ११५ जण जखमी झाले.
महामार्गाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांनी सांगितले की, वेगाने जाणारे वाहन हेच अपघाताला कारणीभूत आहेत. या पट्टय़ात उड्डाणपूल बांधले आहेत, कुठेही कामे सुरू नाहीत. त्यामुळे वाहने सुसाट वेगात जात असतात. त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण नसते त्यामुळे या अपघातात वाढ होत असते. अनेक चालक प्रशिक्षित नसतात. ते कुणाकडून तरी गाडय़ा शिकलेले असतात. त्यांना वाहतुकीचे नियम माहीत नसतात, असे ते म्हणाले.
अपघातांची कारणे
* अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी,
* वाहने ओव्हरटेक करणे,
* क्षमतेपेक्षा जास्त वेळ वाहन चालवणे,
* लवकर पोहोचण्याची घाई,
* मद्यपान करून वाहन चालविणे,
* वेगावर नियंत्रण न ठेवणे,
* चालकाला डुलकी लागणे,
* महामार्ग परिसरात अनेक गावे आहेत. ग्रामस्थ रस्ता ओलांडत असताना बेदरकार वाहनचालकांमुळे अपघात.

वसई पट्टय़ात वाहनचालक वेगाने गाडी चालवत असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होतो. आम्ही सतत येथून जाणाऱ्या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी सीट बेल्ट लावले आहे का, मोटारसायकलस्वारांनी हेल्मेट घातले आहे की नाही ते तपासत असतो.
– आनंद भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक