बाळकुम अग्निशमन केंद्राजवळील सिग्नलवर धोकादायक वाहतूक

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कापूरबावडी-भिवंडी मार्गावरील बाळकुम अग्निशमन दलाच्या केंद्राजवळील सिग्नल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काढून त्या ठिकाणी अडथळे उभारल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोक्याचा ठरू लागला आहे. भर चौकात उभारण्यात आलेले हे अडथळे लक्षात न आल्यास वेगाने येणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची भीती आहे. या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांसाठीही हे अडथळे अडचणीचे ठरत आहेत.

कापूरबावडी-भिवंडी मार्गावरील बाळकुम अग्निशमन केंद्राच्या परिसरातील चौकात सिग्नल उभारण्यात होता. या सिग्नलवरून कोलशेत, हायलँड, बाळकुम, ढोकाळी, मनोरमानगर येथील हजारो वाहने ठाणे आणि भिवंडीच्या दिशेने जात असतात, तर कापूरबावडीमार्गे कशेळी-काल्हेर परिसरात ये-जा करणारी अवजड वाहनेही या मार्गाचा वापर करत असतात. येथील मार्गावर ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो निर्माणाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. या कामासाठी एमएमआरडीएने येथील सिग्नल यंत्रणा काढून चौकात अडथळे उभारले आहेत. त्यामुळे कोलशेत, ढोकाळी हायलँड भागांतून ठाण्यात जाणाऱ्या वाहनांना पलीकडील रस्त्यावरून भरधाव येणारी वाहने दिसत नाहीत, तर ठाण्याहून बाळकुम, भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही सिग्नल नसल्यामुळे हा मार्ग धोक्याचा ठरू लागला आहे. या ठिकाणाच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे कर्मचारीही उपस्थित नसतात. त्यामुळे अपघाताचे प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अडचणीचा मार्ग

हायलँड मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना येथील सिग्नल ओलांडून पलीकडील मार्गावर जावे लागते. मात्र, सिग्नल नसल्याने तसेच चौकातच अडथळे असल्याने काल्हेर भिवंडी येथून ठाण्याकडे येणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे एखादे भरधाव वाहन आल्यास मोठी दुर्घटनाघडण्याची शक्यता आहे. यासंबंधी काही वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. वाहतूक पोलिसांनीही यासंबंधी एमएमआरडीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मेट्रोचे अडथळे

ठाणे महापालिका हद्दीत मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरूअसले तरी अनेक ठिकाणी या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तीन हात नाका परिसर तसेच महामार्गावर मेट्रो कामासाठी उभारण्यात आलेले अडथळे अनेक ठिकाणी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. तीन हात नाका उड्डाणपुलावरून येणारी वाहने आणि पुलाखालून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची भीती असते. घोडबंदर मार्गावरदेखील वाहतुकीचे योग्य नियोजन होत नसल्याच्या तक्रारी असून येथील सेवारस्ते बंद असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.