News Flash

मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणातील आरोपी अटकेत

बंदुकीने गोळी झाडल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

ठाणे : राबोडी भागातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी एकाला अटक केली. इरफान शेख असे आरोपीचे नाव असून त्याने जमील यांच्यावर बंदुकीने गोळी झाडल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांकडून सुरू होती.

दरम्यान, जमील यांच्या खुनाची सुपारी ठाण्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने दिल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासात उघड झाल्याची चर्चा शहरात पसरली होती. मात्र, यास ठाणे पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नाही. तर, राजकीय नेत्याचे नाव पुढे आल्याने राबोडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राबोडी भागातील जमील शेख हे मनसेचे प्रभागाध्यक्ष होते. २३ नोव्हेंबर २०२० ला ते राबोडी शाळा परिसरातून दुचाकीने जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची दिवसाढवळ्या बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. हा सर्व प्रकार परिसरातील एका सीसीटीव्ही चित्रीकरणात उघड झाला होता.  या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एककडून सुरू होता. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चालविणाऱ्या शाहीद शेख याला अटक केली होती. तर, गोळी झाडणाऱ्याचा अद्यापही शोध लागला नव्हता.  या प्रकरणातील आरोपी हा लखनौ येथे असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, उत्तर प्रदेश पोलिसांनी इरफान याला ताब्यात घेऊन अटक केली.

जमील यांच्या हत्येसाठी ठाण्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने सुपारी दिल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासात समोर आले. तशी चर्चा शहरात पसरली होती. मात्र, त्यास ठाणे पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या चर्चेमुळे राबोडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच जमावही जमला होता. हा जमाव घोषणाबाजी करून निघून गेल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 1:04 am

Web Title: accused in murder case of mns office bearer arrested akp 94
Next Stories
1 ठाणे मनोरुग्णालयातील २७ रुग्ण करोना बाधित! १२ इमारती धोकादायक, पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष!
2 वसईत थरार! सोसायटीचा सुरक्षारक्षक बनला सुपरमॅन, घरात आग लागलेल्या गॅस सिलेंडरला हाताने उचलून गटारात टाकले
3 ठाणे कारागृहातील कैद्यांनाही लस
Just Now!
X