मुखपट्टी न वापरणे, अलगीकरणाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना लगाम

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी आता नियम पायदळी तुडविणाऱ्या नागरिक आणि दुकानदारांविरोधात दोन दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यात वाहनचालक, नागरिक, दुकानदार यांचा समावेश आहे. त्यापैकी ४६५ जणांवर पोलिसांनी, तर २२ जणांवर पालिकेच्या पथकाने कारवाई केली.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक जण मुखपट्टी न वापरता रस्त्यावरून फिरतात. तसेच करोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबीयांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात येते. त्यांच्या हातावर पालिकेकडून विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येतात. मात्र, त्यापैकी काही जण शिक्का मारलेल्या भागात रुमाल बांधून बाजारात, सोसायटीच्या गच्चीवर, आवारात बिनधास्तपणे फिरत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा नागरिकांचा शोध घेऊन पालिका आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहे. दुकानदारांना सम, विषम तारखेप्रमाणे दुकान उघडण्याची परवानगी दिली आहे. तरीही काही दुकानदार दोन्ही दिवशी दुकान उघडे ठेवून नियमभंग करीत आहेत. अशा दुकानदारांवर प्रभाग अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

अनेक फेरीवाले सकाळपासून सायंकाळपर्यंत फडके रस्ता, दत्तनगर, राजाजी रस्ता, रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर दंडात्मक, सामान जप्तीची कारवाई केली जाते. दत्तनगर, राजाजी रस्ता, शिवमंदिर रस्ता, चार रस्ता भागात नियमभंग करून व्यवसाय करणाऱ्या २० हून अधिक फळ, भाजीपाल्याच्या हातगाडय़ा बाजीराव अहिर यांच्या पथकाने जप्त केल्या आहेत. कल्याण पूर्वेतील ड प्रभागात बुधवारी सायंकाळी २२ दुकानदार, पादचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावून त्यांच्याकडून ११ हजार रुपयांचा एकत्रित दंड वसूल केला, असे संजय कुमावत यांनी सांगितले.

अनेक रहिवासी मास्कऐवजी रुमाल गळ्यात अडकून ठेवतात किंवा नाकाखाली ठेऊन प्रवास करतात. तसेच वाहनेही चालवितात. पोलीस कारवाई सुरू असली की ते मुखपट्टी घातल्याचा आव आणतात. अशा बेशिस्त पादचारी, वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

– सुरेश अहिर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे</strong>