कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या पाच दिवसात मुखपट्टीविना फिरणाऱ्या ९२४ नागरिकांवर महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून चार लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत टिटवाळा, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, तिसगाव नाका, पश्चिमेतील बैलबाजार परिसरातील रहिवाशांचा सर्वाधिक समावेश आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी फिरताना प्रत्येक रहिवाशाने मुखपट्टीचा वापर करावा, असे पालिकेने आदेश दिले आहेत. तरीही अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत मुखपट्टी वापरण्यास टाळटाळ करीत आहेत. काही नागरिक मुखपट्टीविनाच बाजारात खरेदीसाठी येत आहेत. तर, काही शतपावलीसाठी घराबाहेर पडत आहेत.  अशा नागरिकांमुळे करोनाचा धोका वाढण्याची भीती अधिक आहे.  अशा नागरिकांविरोधात महापालिका आणि पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

मागील आठवडय़ात ७५० हून अधिक नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करून साडेतीन लाखाहून अधिक रकमेचा दंड वसूल केला होता. मुखपट्टीविना फिरण्यांचे सर्वाधिक प्रमाण शहरालगतच्या ग्रामीण पट्टय़ात असल्याचे दंडवसुली आकडेवारीवरून दिसून येते.

दंडात्मक वसुली

अ प्रभाग   : २२ हजार ५००

ब प्रभाग    :  ४३ हजार ५०० दंड

क प्रभाग   : १ लाख १५ हजार

जे प्रभाग   : ३७ हजार

ड प्रभाग    : ४३ हजार ५००

फ प्रभाग   : ३८ हजार

ह प्रभाग    : ४० हजार

ग प्रभाग    : २५ हजार

आय प्रभाग : ४५ हजार ५००

ई प्रभाग    : ५० हजार ८००