कळवा येथील वाघोबानगर आणि भास्करनगर परिसरातील आठ बोगस डॉक्टरांना ठाणे पोलिसांनी रुग्णांवर औषधोपचार करतानाच पकडले आहे. या डॉक्टरांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बोगस पदव्या प्रमाणपत्रे जप्त केली आहेत.

आलोक सिंह (३९), रमजित गौतम (४७), गोपाल बिश्वास (४७), रामतेज प्रसाद (५०), सुभाषचंद्र यादव (४७), जयप्रकाश विश्वकर्मा (४०), दीपक विश्वास (४८) आणि सत्यनारायण बिंद (४२) अशी अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. या सर्वानी वाघोबानगर आणि भास्करनगर या भागात आपले दवाखाने थाटले होते.

कळवा परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानंतर गुरुवारी रात्री ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने वाघोबा नगर आणि भास्कर नगर परिसरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी या डॉक्टरांची पदवी प्रमाणपत्रे तपासली असता, ती बोगस असल्याचे तपासणीत समोर आले. या डॉक्टरांच्या दवाखान्यातून पोलिसांनी औषधांचा साठा, इंजेक्शन, सलाइन असे साहित्य जप्त केले आहे.