News Flash

पाचव्या दिवशीही फेरीवाल्यांची दाणादाण

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम गेले पाच दिवसांपासून फ प्रभागात सुरू आहे.

अनधिकृत फेरीवाले, दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

निवारा शेड जमीनदोस्त
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम गेले पाच दिवसांपासून फ प्रभागात सुरू आहे. सकाळ, संध्याकाळ सुरू असलेल्या या कारवाईत रस्त्यावरील निवारा शेड, अडवून ठेवलेले पदपथ मोकळे करण्यात येत आहेत. पाच वर्षांनंतर प्रथमच ‘फ’ प्रभागाने एवढी धडाकेबाज मोहीम उघडली आहे. कल्याणमध्ये ‘क’ प्रभागाने पश्चिम भागात महालक्ष्मी हॉटेलच्या कोपऱ्यावर भरणारा अनधिकृत बाजार हटविण्याची कारवाई सुरू केली आहे.
फेरीवाल्यांविरुद्ध पालिका प्रशासन प्रथमच एवढे आक्रमक झाल्याने रस्ते, पदपथ मोकळे दिसू लागले आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. फेरीवाल्यांमुळे कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना चालण्यासाठी रस्ते नसल्याची परिस्थिती सध्या उद्भवली आहे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजपने पहिले रेल्वे स्थानक भागातून फेरीवाल्यांचे कायमचे उच्चाटन करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
डोंबिवलीत ‘फ’ प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक प्रमुख संजय कुमावत, दिलीप भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रेल्वे स्थानक भागातील चिमणी गल्ली, नेहरू रस्ता, फडके रस्ता, बाजीप्रभू चौक भागातील भाजीपाला, फूल विक्रेते, व्यापाऱ्यांनी ऊन, पावसापासून आडोसा म्हणून केलेल्या निवारा शेड तोडून टाकण्यात आल्या. इशारा देऊनही पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात येत आहे. या कारवाईनंतरही फेरीवाले रस्त्यांवर बसू लागले तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे कुमावत यांनी सांगितले.
पालिकेचा निर्णय धाब्यावर
कल्याणमध्ये लक्ष्मी भाजीबाजार बाजार समितीच्या आवारात भरविण्यात यावा, असा गेल्या पाच वर्षांपूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने निर्णय घेतला आहे. तरीही काही स्वार्थी मंडळींच्या हितासाठी भाजीबाजार रेल्वे स्थानक भागात भरविण्यात येतो. हा भाजीबाजार रेल्वे स्थानक भागात वाहतूक कोंडी,कचरा निर्माण करीत असल्याने कायमस्वरूपी हटविण्यासाठी पालिकेने गेल्या काही दिवसांपासून मोहीम उघडली आहे. या विक्रेत्यांची वाहने रेल्वे स्थानक भागात उभी करून देण्यात येत नाहीत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

‘ग’ प्रभागात लांगूलचालन सुरूच!
‘फ’ प्रभागात दणक्यात कारवाई सुरू असताना, डोंबिवलीतील ‘ग’ प्रभागाच्या अधिकाऱ्यांसह फेरीवाला हटाव पथक मात्र फेरीवाल्यांचे लांगूलचालन, त्यांना योग्य ठिकाणी बसविणे आणि आशीर्वाद घेण्यात व्यस्त असल्याचे दृश्य दिसत आहे. ‘ग’ प्रभागातील फेरीवाले हटविण्यात येत नसल्याने उर्सेकरवाडी, पाटकर रस्ता, डॉ. रॉथ रस्ता, राजाजी रस्ता, वाहतूक कार्यालय परिसर गजबजून गेलेला असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 2:50 am

Web Title: action against hawkers in thane
Next Stories
1 पाणीचोरांवर अखेर कारवाई!
2 रखडलेल्या वाहनतळप्रकरणी खासदारांकडून रेल्वेची झाडाझडती
3 वाहनांची वर्दळ वृद्धांसाठी धाकधुकीची!
Just Now!
X