संगणक सामग्री, टोपण नावांची माहिती, कागदपत्रे पोलिसांकडून हस्तगत

अमेरिकन नागरिकांशी संपर्क करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरवरील ठाणे पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. शनिवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने चार बनावट कॉल सेंटरवर कारवाई केली.

ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर या गुन्हेगारीचा पर्दाफाश झाल्यानंतर हे कॉल सेंटर बंद करून आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी अशा बंद कॉल सेंटरवर कारवाई करून तेथील संगणक, संगणकाच्या हार्डडिस्क, कर्मचाऱ्यांसाठीचे सूचना फलक, टोपण नावांची माहिती याच्यासह अनेक कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलीस कारवाई सुरू झाल्यानंतर हे कॉल सेंटर बंद करताना या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींकडून काही संगणकांमधील हार्डडिस्कही काढण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील मीरा रोड परिसरात बनावट कॉल सेंटरच्या प्रकरणी गुन्हे ठाणे गुन्हे शाखेने उघड केले असून यातील गुन्हेगारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कॉल सेंटरवर धाडी टाकण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे या प्रकरणाची तपास करत असताना अन्य चार ठिकाणी अशाच प्रकारचे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पराग मणेरे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले.

मीरा रोड पूर्वेतील शांती प्लाझा, सेक्टर नं. ११ च्या पहिल्या माळ्यावर बनावट कॉल सेंटर परवेज मोहमद मिया कुरेशी चालवत होता. येथील झडतीमध्ये २१ संगणक मिळाले असून त्यापैकी १८ संगणकाच्या हार्डडिस्क काढण्यात आल्याचे दिसून आले. तसेच स्पेस रिअ‍ॅलिटी ९१२ या बिल्डिंगमधील कॉल सेंटरमधून कागदपत्रे, फोन संभाषणाची स्क्रिप्ट आणि ३९ हार्डडिस्क काढलेल्या अवस्थेतील संगणक ताब्यात घेण्यात आले.

अमेरिकेतील नागरिकांना फसवण्यासाठी कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांसाठी लावण्यात आलेला सूचना फलक तेथे आढळला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. त्यावर कॉल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव, त्यांना दिलेले लक्ष्य, संपर्क करताना वापरायची नावे, दिनांक अशी माहिती होती.