– अंबरनाथमध्ये अनधिकृत बांधकामे पाडण्याचा प्रशासनाने धडाकाच लावला असून नुकत्याच राज्य महामार्गासाठी केलेल्या १०७३ अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या कारवाईनंतर पूर्व भागातील शिवमंदिराला लागून असलेल्या बारकू पाडा, प्रकाशनगर परिसरातील शासकीय जमिनीवर उभारलेले ४० गाळे व ५० घरांच्या चार चाळी पाडण्यात आल्या. 

– अंबरनाथ-बदलापूर पट्टय़ात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढीस लागले असून अनेक दिवस कारवाईच न झाल्याने ही वाढत्या बांधकामांची संख्या समस्या प्रशासनापुढे आ वासून उभी राहिली आहे. त्यामुळे आता प्रशासनाला खडबडून जाग आली असून त्यांनी अंबरनाथमध्ये ही बांधकामे पाडण्याचा धडाका लावला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील बारकूपाडा व प्रकाश नगर परिसरातील शासनाच्या जागेवर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. या बांधकामाविरोधात फार्मिग सोसायटीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही बांधकामे पाडण्यात आली.
– ग्राहकांची फसवणूक?
– या चाळीतील घरे जे. एस. पी. ग्रुप बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या नावाने जाहिरात करून पाटील नगर या नावाखाली ६ ते ८ लाख रुपयात ही घरे विकण्यात आल्याची चर्चा होत आहे. परंतु, ही घरे शासकीय जमिनीवर असल्याने घर घेतलेल्या नागरिकांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
– याबाबत जे. एस. ग्रुपचे पाटील यांना विचारले असता ही जमीन शासनाची नसून आमच्या मालकीची आहे. सदरची कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. मात्र आम्हाला सव्‍‌र्हे करण्यासाठीही वेळ न देता थेट कारवाई करण्यात आली आहे. आम्ही कुणालाही फसवले नसून शासकीय जमिनीवरील इतर बांधकामांना मात्र तीन दिवसांची मुदत देण्यात आल्याचे पाटील या वेळी म्हणाले.

– शासकीय जमिनीवर ही अनधिकृत बांधकामे उभी होती. त्यामुळे पाडण्याची कारवाई करण्यात आली असून पुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे. बांधकाम अनधिकृत आहे का ते तपासूनच नागरिकांनी घर घ्यावे.
अमित सानप, तहसीलदार अंबरनाथ