जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांचा वाळूमाफियांना तडाखा
कल्याण, भिवंडी आणि ठाणे भागातील अनधिकृत रेती उपसा थांबविण्यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी तिसरी मोठी कारवाई केली. या कारवाईत जवळपास ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वी केलेल्या दोन कारवायांमध्ये अनुक्रमे १० कोटी आणि १२ कोटींचे साहित्य जप्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कारवायांमुळे रेती उपशाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असले तरी त्यावर नियंत्रण कायम राखण्यासाठी पुन्हा कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.
ठाणे, कल्याण आणि भिवंडी परिसरातील खाडी किनाऱ्यावर सेक्शन पंपाच्या साहाय्याने अनधिकृत रेती उपसा करणाऱ्या रेतीमाफियांनी मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. याविरोधात ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी धडक कारवाई करीत त्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी रेतीमाफियांविरोधात उघडलेल्या मोहिमेमध्ये केलेल्या दोन कारवायांमध्ये सुमारे २२ कोटींहून अधिक मालमत्ता जप्त झाली होती. असे असले तरी रेतीमाफिया पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळीच पोलिसांचा फौजफाटा घेऊन तहसीलदार, नायब तहसीलदार आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी कशेळी, आलिमघर, मुंब्रा, कौसा, डोंबिवली आणि कल्याण भागाच्या खाडीनजीक बोटींमधून धडक मारली. सकाळी ७ वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या प्रकरणांमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. आलिमघर भागात ८ सेक्शन पंप तर मुंब्रा भागात ७ आणि डोंबिवली खाडीतून ४ सेक्शन पंप जप्त करण्यात आले. एकंदर ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सुदाम परदेशी, भिवंडीच्या तहसीलदार वैशाली लंभाते, भिवंडीचे प्रांत अधिकारी संतोष थिटे व अन्य कर्मचारीही सहभागी झाले होते.