६ कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल नष्ट; ३२० ब्रास रेतीसाठा जप्त

ठाणे : जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील खाडी पात्रात अवैधरीत्या रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध ठाणे जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३२ सक्शन पंप, २५ बार्जसह ५२ ठिकाणी रेतीसाठा करण्यासाठी उभारण्यात आलेले हौद उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच ३२० ब्रास रेतीदेखील जप्त करण्यात आली आहे. कारवाईत सुमारे ६ कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे, कल्याण आणि भिवंडी खाडी पात्रात मोठय़ा प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्य़ातील १४ अधिकारी आणि १५० कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. ठाणे तहसीलदार अधिक पाटील यांनी रेतीबंदर आणि गणेश घाट परिसरात केलेल्या कारवाईत एकूण २ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी अलिमघर येथे ही कारवाई केली.

कोनगाव आणि नारपोली पोलिसांच्या साहाय्याने सोमवारी दिवसभर खाडीपात्रात केलेल्या कारवाईत सुमारे २ कोटी १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  कोनगांव आणि नारपोली पोलीस ठाण्यात रेती माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार विभागाने दिली.

कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनीदेखील खाडी पात्रात प्रत्यक्ष उतरून अवैद्य रेती उपसा विरोधात कारवाई केली. सुमारे ८० लाखांचा मुद्देमाल यावेळी नष्ट करण्यात आला.