तातडीने कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागातर्फे कामाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी दिले. निवडणुकीची कामे शिक्षकांकडे सोपविण्यासंबंधी न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असतानाही महापालिका शाळांमधील काही शिक्षक हे काम नाकारत असल्यामुळे निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीची तातडीने दखल घेत अशा शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत.

पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मुंबई, ठाण्यासह राज्यातील १५ महापालिकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून प्रथमच ही जबाबदारी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवली जाणार असल्याचे वृत्त आहे. महापालिका स्तरावर प्रभागांची रचना, नव्याने मतदार नोंदणी तसेच इतर काही कामे शिक्षकांकडून करून घेतली जात असतात. अशा कामांना शिक्षकांचा मोठा विरोध असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणूक आयोगाच्या मदतीसाठी शिक्षकांना जुंपण्याशिवाय पर्याय नसतो, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून यंदाही महापालिका प्रशासनाने शाळांमधील शिक्षकांना या कामासाठी जुंपले आहे. मात्र, काही शिक्षकांनी या कामास नकार दिल्याने नवा वाद निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांनी निवडणूक विभागातर्फे सोपविण्यात आलेली जबाबदारी नाकारली त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील तरतुदींच्या आधारे शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी, असे आदेश शुक्रवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले. यासंबंधी शुक्रवारी सर्व उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.