13 December 2017

News Flash

खासगी बसविरोधात कारवाई

या वाहतुकीमुळे ठाणे पूर्व स्थानक (कोपरी) भागात वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा उडाल्याचे चित्र होते.

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: May 19, 2017 1:56 AM

पुढील आठवडय़ात विशेष मोहीम; वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता

ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बसगाडय़ांना वाहतूक पोलिसांनी कोपरीत बंदी घातल्यामुळे या बसचालकांनी ठाणे पश्चिमेतून प्रवाशांची बेकायदा वाहतूक सुरू केली आहे. या वाहतुकीविरोधात ठाणे परिवहन सेवा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने पुढच्या आठवडय़ापासून संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मूळ शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांच्या उत्पन्नावर होणारा प्रतिकूल परिणामही कमी होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर मार्गावर खासगी बसगाडय़ांमधून प्रवाशांची बेकायदा वाहतूक सुरू होती. या वाहतुकीमुळे ठाणे पूर्व स्थानक (कोपरी) भागात वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा उडाल्याचे चित्र होते. या नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या कोपरीवासीयांनी खासगी बसगाडय़ांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच या बसगाडय़ांविरोधात दंड थोपटून आंदोलन उभारले होते. त्यानंतर प्रवाशांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांना वाहतूक पोलिसांनी कोपरीत प्रवेश बंदी लागू केली असून या निर्णयामुळे कोपरी भागातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. असे असतानाच कोपरी बंदीनंतरही खासगी बसमालकांनी बेकायदा वाहतुकीचा व्यवसाय सुरूच ठेवला असून त्यासाठी ठाणे पश्चिमेतून बस वाहतूक सुरू केली आहे. घोडबंदर, तीन हात नाका, हरीनिवास सर्कल, विष्णूनगर, राममारुती रोड आणि गोखले रोड या मार्गे खासगी बसचालकांनी वाहतूक सुरू केली आहे. आधीच राममारुती रोड आणि गोखले मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असतानाच आता त्यात खासगी बसगाडय़ांची भर पडू लागली आहे. या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये गेल्या आठवडय़ात वृत्त प्रसिद्घ झाले होते. या वृत्ताची दखल बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आली.

परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी पश्चिमेतून बेकायदा वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाने बसगाडय़ांवर काय कारवाई केली आहे, असा प्रश्न केला. दरम्यान, कोपरीतील प्रवेशबंदीनंतर खासगी बसगाडय़ांची ठाणे पश्चिमेतून वाहतूक सुरू झाली असून या बसगाडय़ांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेदरम्यान, ठाणे परिवहन सेवा आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे संयुक्त पथक तयार करून त्यामार्फत पुढील आठवडय़ापासून या बसगाडय़ांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ठाणे परिवहन सेवेचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी बैठकीत सांगितले.

प्रादेशिक परिवहनची मदत घेणार 

ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील रस्ते व पदपथ अडविणारे फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात गेल्या आठवडय़ापासून कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच आता शहरात बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांवरही कारवाई करण्याचा निर्णय परिवहन सेवेने घेतला असून त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ापासून ही मोहीम सुरू होणार असल्यामुळे पश्चिमेतील बेकायदा बस वाहतुकीला लगाम बसण्याची चिन्हे आहेत.

First Published on May 19, 2017 1:15 am

Web Title: action against private bus