महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; पाच ठिकाणी पाहणी

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही कठोर कारवाई होत नसल्याने प्रदूषणकारी कंपन्या आणि कारखाने बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांच्या पथकाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने शहरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पाच ठिकाणी विनापरवानगी सुरू असलेल्या जीन्स धुलाई कारखान्यातून प्रक्रिया न करता सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांत वालधुनी नदीच्या पात्रात आनंदनगर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतल्या विविध कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडले जात असल्याचे निदर्शनास आले होते. अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत अंबरनाथ शहरातील वालधुनी नदी पात्राशेजारच्या भागाची पाहणी केली असता विविध ठिकाणी जीन्स धुलाई कारखाने विनापरवाना सुरू असल्याचे समोर आले. अशा पाच कारखान्यांवर पालिकेच्या पथकाने छापा मारला. यावेळी कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचे दिसून आले.

तसेच काही ठिकाणी सांडपाणी जमिनीत मुरवले जात होते. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सांडपाण्याचे नमुनेही घेतले. हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विनापरवाना चालणाऱ्या या कंपन्यांच्या मालकांवर आता कारवाई केली जाणार आहे.  यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांना दिला असून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका कारवाई करणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी दिली.

अंबरनाथची कचराभूमी धुमसतीच

डिसेंबर महिन्यात अंबरनाथच्या कचराभूमीला लागलेल्या आगीची झळ जवळपास सात दिवस जाणवली. त्यानंतरही महिनाभर कचराभूमी धुमसत असल्याचे चित्र होते. बुधवारी रात्री अंबरनाथच्या कचराभूमीला पुन्हा आग लागली. त्यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने सकाळपासून या कचराभूमीवर आग लागलेल्या ठिकाणी माती टाकण्याचे काम सुरू होते. गेल्या काही वर्षांत येथे शेकडो ट्रक माती टाकून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र कचराभूमी हटवण्यासाठी ठोस हालचाली करणे पालिकेला शक्य झालेले नाही. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना आजही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.