27 September 2020

News Flash

१४ हजार थकबाकीदारांवर कारवाई

करवसुलीसाठी प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांत केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

मार्च अखेपर्यंत मालमत्ता कराची  ११३ कोटींची थकबाकी वसूल करण्याचे कडोंमपाचे उद्दीष्ट

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून कर विभागाने गेल्या तीन महिन्यांत १३ हजार ९१७ कर थकबाकीदारांवर कारवाई केली. पालिकेला ११३ कोटी २६ लाख ९२ हजार रुपये येत्या मार्च अखेपर्यंत वसूल करायचे आहेत. आतापर्यंत २६६ कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. करवसुलीसाठी प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांत केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

आयुक्त गोविंद बोडके यांनी या वेळी करवसुलीत कोणत्याही प्रकारची अनियमितता राहू नये, म्हणून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती तोळामासा असल्याने, अंदाजपत्रकातील अपेक्षित उत्पन्न मिळाल्याशिवाय विकासकामे हाती घेता येणार नाहीत, असे आयुक्त बोडके यांचे म्हणणे होते. त्यामुळे जोपर्यंत कर पूर्ण क्षमतेने वसूल होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी करवसुलीत कोणतीही कसूर ठेवू नये असे आदेश आयुक्तांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

नियमित व थकीत कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, त्या कुलूपबंद करणे, त्यांचा लिलाव करण्याचे आदेश आयुक्तांनी कर निर्धारक संकलक, कर अधीक्षक, प्रभाग अधिकारी यांना दिले होते. आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ कोटींनी अधिक मालमत्ता कर वसूल झाला आहे.

मालमत्ता कर अनेक वर्षे न भरणाऱ्या ८३९ मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मालमत्ताधारकांकडून आठ कोटी ७४ लाख येणे बाकी आहेत. ४०८ मालमत्ता कुलूपबंद करण्यात आल्या आहेत. २८ कोटी ६५ लाख ८७ हजार रुपये येणे बाकी आहेत. १२ हजार ६२० मालमत्ताधारकांना कर भरण्याच्या अंतिम नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांनी वेळेत करभरणा केला नाही तर पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्त करणे आणि त्यांचा लिलाव करण्याच्या प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत.

४९ थकबाकीदारांना अंतिम समन्स बजावण्यात आले आहेत. त्यांच्याकडे २७ कोटी ४३ लाख ७३ हजार रुपयांची कराची थकबाकी आहे, असे मालमत्ता विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मार्च अखेपर्यंत बहुतांशी करवसुली होईल, अशी अपेक्षा आयुक्त बोडके यांनी व्यक्त केली आहे.

गतवर्षी ३०६ कोटींची वसुली

मागील आर्थिक वर्षांत पालिकेने मालमत्ता करातून ३०६ कोटी ३३ लाख रुपये वसूल केले होते. यामध्ये चाल कर वसुलीतील २०७ कोटी ३ लाख, मुक्त जमीन कर थकीत रकमेतील ९९ कोटी तीन लाख रुपये वसूल केले होते. मागील वर्षी करवसुलीचे लक्ष्य ३४६ कोटी ८९ लाख रुपये होते. मागील वर्षी ४० कोटी ५६ लाख रुपये कमी वसुली झाली होती, असे कर विभागातील सूत्राने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 12:44 am

Web Title: action on 14 thousand takers in kdmc
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत मलनि:सारण घोटाळा?
2 जलद वाहतुकीचा संकल्प
3 येऊरमधील दारूभट्टय़ा उद्ध्वस्त
Just Now!
X