जागा अडवणाऱ्यांविरोधात व्हॉट्सअ‍ॅप चित्रफितीच्या माध्यमातून कारवाईस वेग

लोकल ट्रेनमध्ये जागा अडवणाऱ्या मुजोर प्रवाशांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र झाली आहे. आतापर्यंत पोलिसांनी १९३ प्रवाशांवर कारवाई केली आहे. सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला असून त्या आधारे मुजोर प्रवाशांचे चित्रीकरण करून कारवाई केली जात आहे.

लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या मुजोर प्रवाशांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी ४ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना या दादागिरीचा मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे येऊ  लागल्याने विरार ते बोरिवलीदरम्यान रेल्वे पोलिसांनी आपली पथके तैनात केली असून जे लोकलच्या गेटवर राहून दादागिरी करून सामान्य प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू देत नाहीत, अशा प्रवाशांवर वेगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी. एन. मल्ल यांनी याबाबत सांगितले की, आम्ही व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला आहे. स्थानकात ट्रेन आली की जे प्रवासी दारात जागा अडवून उभे असतात त्यांचे चित्रीकरण केले जाते. ती चित्रफीत लगेच आमच्या ग्रुपवर टाकली जाते. पुढील स्थानकातील पोलीस लगेच या चित्रफितीच्या आधारे या मुजोर प्रवाशांवर कारवाई करत आहेत. आठवडय़ाभरात आम्ही १९३ प्रवाशांवर कारवाई केली आहे. किमान ५०० प्रवाशांवर कारवाई झाली तरच या मुजोरीला आळा बसेल, असे ते म्हणाले. या कारवाईमुळे सर्वसामान्य प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.