दुसऱ्या दिवशी सुपर मार्केटसह १४० बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

कळव्यातील रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत रस्त्यालगतची वाढीव बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही दिवसभर सुरू होती. या कारवाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या कळव्यातील सुपर मार्केटसह सुमारे १४० हून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. एका इमारतीला खेटूनच तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम करून तिथे सुपर मार्केट थाटण्यात आले होते. त्यामुळे या बांधकामावर बुलडोझर चालवून ते भुईसपाट करण्यात आले आहे. गुरुवारपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे कळव्यातील मुख्य चौक तसेच रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

ठाणे शहरातील पोखरण रस्ता क्रमांक-१ आणि २, तीन हात नाका या भागातील बांधकामे हटविल्यानंतर मुंब्य्रातील मुख्य रस्त्यावरील बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंब्य्रात तीन हजाराहून अधिक बेकायदा बांधकामे पाडण्यात आली असून महापालिकेची आजवरची ही सर्वात विक्रमी कारवाई ठरली आहे. त्यापाठोपाठ आयुक्त जयस्वाल यांनी गुरुवारपासून कळव्यातील बेकायदा बांधकामांकडे मोर्चा वळविला असून या कारवाईमध्ये कळवा खाडी पुलालगत असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यालय तसेच कळवा चौकातील वाट अडविणारी शिवसेना शाखेच बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. याशिवाय रस्त्यालगत उभारण्यात आलेली दीडशेहून अधिक बांधकामे पाडण्यात आली. शुक्रवारीही दिवसभर ही कारवाई सुरू होती. त्यामध्ये कळवा चौक ते स्थानक, कळवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि कळवा चौक ते पारसिकपर्यंत रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंची १४० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी कळव्यातील सुपर मार्केट, वाढीव शेड्स हटविण्यात आली.

रस्ते मोकळे, वाहतूक सुरळीत

कळवा-मुंब्रा तसेच नवी मुंबईकडे जाण्यासाठी कळवा चौकातून जावे लागते, मात्र हा चौक गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला होता. कळवा चौकातून पारसिककडे जाण्यासाठी दुपदरी मार्ग आहे, पण अनेक कारणांमुळे एकच पदरी मार्ग वाहतूकीसाठी खुला असायचा. त्यामुळे या कोंडीतून वाट शोधताना चालकाच्या नाकी नऊ येत होते. बेकायदा बांधकामांच्या विळख्यामुळे चौकाचा श्वास एक प्रकारे कोंडल्याचे चित्र होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे कळवा चौकासह प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कळव्यातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई पूर्ण झाली असून आता रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.