३६ डॉक्टर बेपत्ता, तर आठ जणांवर गुन्हे; ४ रुग्णालयेही बंद

वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांचा तसेच बेकायदा रुग्णालयांचा सुळसुळाट असल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता वसई-विरार’ने उघडकीस आणले होते. या वृत्तानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य विभागने या डॉक्टरांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. तब्बल ८ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर ३२ बोगस डॉक्टरांनी कारवाईच्या भीतीने गाशा गुंडाळला आहे. ४ बेकायदा रुग्णालयेही बंद करण्यात आली आहेत.

वसई-विरार शहरात २१० नोंदणीकृत रुग्णालये असून ७१० नोंदणीकृत क्लिनिक आहेत. त्यात हजारो डॉक्टर रुग्णसेवा करत आहेत. मात्र शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू होता. परराज्यातून मान्यता नसलेल्या पदव्या, बनावट पदव्या घेऊन अनेक स्वयंघोषित डॉक्टरांनी वसई-विरार शहरात आपापली दुकाने उघडली होती. नॅचरोपॅथी, बीएएचएमएस, आयुर्वेदिक तसेच फिजीओथेरेपिस्टसुद्धा अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करत होते. याशिवाय तब्बल ४ बोगस रुग्णालये सुरू होती. एका बोगस रुग्णालयातून एका बालिकेचा प्राणही गेला होता. सर्वाधिक बोगस डॉक्टांचा सुळसुळाट नालासोपारा पूर्वेला होता. ‘लोकसत्ता वसई-विरार’ने ही गंभीर बाब समोर आणून पाठपुरावा सुरू केला होता. पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्या मार्गदर्शानाखाठी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांच्या पथकाने सुरुवातीला ५१ बोगस डॉक्टरांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर त्यांचा तपासणी सुरू केल्यानंतर बोगस डॉक्टरांनी काढता पाय घेतला. कुठल्याही प्रकारची पदवी नसलेले आणि दुकाने चालविणारे ३४ बोगस डॉक्टर आपापली दुकाने बंद करून पळून गेले. पालिकेने ५१ बोगस डॉक्टरांच्या यादीतील ३ तसेच आणखी ५ अशा मिळून एकूण ८ डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले. १४ डॉक्टर हे नेचरोपॅथी, होमिओपॅथी, फिजीओथेरेपी, बीएचमएमएस तसेच आयुर्वेदिक होते, तरीसुद्धा ते सर्रास अ‍ॅलोपॅथीची पॅ्रक्टीस करत होते.

४ बोगस रुग्णालयेही बंद

एकीक डे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असताना काहींनी चक्क रुग्णालये थाटली होती. पालिकेला ४ रुग्णालये आढळली. त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारच्या सुविधा नव्हत्या. त्यांना पालिकेने नोटिसा देऊन कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र ती बोगस निघाल्याने पालिकेने नोटिसा देऊन ही चारही रुग्णालये बंद केली आहेत. यामध्ये बालाजी रुग्णालय, (संतोष भुवन), रिफ केअर हॉस्पिटल, जगन्नाथ हॉस्पिटल (मनवेलपाडा) आदींचा समावेश आहे.

पॅथोलॉजी लॅबवरही कारवाई

बोगस डॉक्टर आणि रुग्णालयांबरोबर बोगस पॅथोलॉजी लॅबही शहरात आहेत. डीएमएलटी प्रमाणपत्रधारकाला पॅथोलॉजी लॅब उघडण्याचा अधिकार आहे, परंतु लॅबमध्ये तज्ज्ञ पॅथोलॉजिस्ट डॉक्टर असणे आवश्यक आहे. ज्या लॅबमध्ये पॅथोलॉजिस्ट डॉक्टर नाही, त्या सर्व लॅब बेकायदा असतात. पालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणातून केवळ ४० पॅथोलॉजी लॅब अधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने बेकायदा पॅथोलॉजी लॅबचा शोध सुरू केला. मंगळवारी संध्याकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाने तुळींज पोलिसांच्या मदतीने नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथून बिरेंद्रकुमार यादव (२७) याला अटक केली. यादव हा पॅथोलॉजिस्ट डॉ. एस. एन .त्रिपाठी यांच्या सहीने लॅब चालवत होता, परंतु सिंह यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचे उघड झाले.

आम्ही सर्व सखोल तपास करून बोगस डॉक्टरांवर कारवाई केलेली आहे. बोगस डॉक्टर तसेच बोगस पॅथोलॉजी लॅब विरोधात ही कारवाई सुरूच राहणार आहे.

– डॉ. अनुपमा राणे, आरोग्याधिकारी