News Flash

६१० अनधिकृत बांधकामे भुईसपाट

या मोठय़ा कारवाईत जवळपास ३६० व्यावसायिक आणि २५० निवासी बांधकामे पाडण्यात आली.

 

कळवा रेतीबंदरवरील व्यावसायिक आणि निवासी बांधकामांवर ठाणे पालिकेची कारवाई.

कळव्यातील नियोजित चौपाटीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईत रेतीबंदर परिसरातील ३६० व्यावसायिक तर २५० निवासी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. रेतीबंदर परिसरातील जवळपास चार किलोमीटर अंतराचा पट्टा या वेळी अतिक्रमण मुक्त करण्यात आला. तसेच पारसिक नाक्यावर बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या अमित गार्डन या आलिशान हॉटेलमधील बेकायदा बांधकामही मोठय़ा पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली ही गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम मानली जात आहे. कळवा, मुंब्रा परिसरातील खाडीकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिले असून शासकीय जमिनींवर झालेल्या या अतिक्रमणांकडे जिल्हा प्रशासनानेही कानाडोळा केला होता. या भागात कळवा, पारसिकनगर तसेच मुंब्रा परिसरातील रहिवाशांसाठी चौपाटी उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी आखला होता. दरम्यान, ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात सुरू झालेल्या कारवाईचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कळव्याचा खाडी किनारा अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या मोठय़ा कारवाईत जवळपास ३६० व्यावसायिक आणि २५० निवासी बांधकामे पाडण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईत बाधित झालेल्या रहिवाशांना तत्काळ दोस्ती रेंटल हौसिंगमध्ये राहण्यासाठी जागेवरच ताबापत्रेही दिली.

कारवाईसाठी पालिकेचे पथक

कशेळी पूल ते रेल्वे स्लो ट्रॅक बोगद्यापर्यंत तानाजी चाळ, रमेश चाळ, आर.सी. पाटील चाळ, भगत चाळ अशी जवळपास २५० च्या आसपास रहिवासी चाळी रिकाम्या करून पाडल्या. तर ३६०च्या आसपास व्यावसायिक बांधकामे पूर्णत: जमीनदोस्त केली. १० विशेष पथकांनी १५ पोकलेन, २० जेसीबी २०० कामगार आणि १५० पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या साहाय्याने ही कारवाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:55 am

Web Title: action on illegal encroachment on kalwa road
Next Stories
1 बेशिस्त कर्मचाऱ्यांवर आयुक्तांची मेहेरबानी
2 फुलपाखरांच्या जगात : मलाबार ट्री निम्फ
3 नामवंतांचे बुकशेल्फ : सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत
Just Now!
X