ठाणे शहरातील अनधिकृत इमारतींमध्ये सुरू असलेल्या उपाहारगृहे तसेच बारवर अखेर गंडांतर येणार आहे. ठाणे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या एका प्रस्तावानुसार यापुढे शहरातील अधिकृत इमारतींमध्ये सुरू असलेल्या उपाहारगृहांना खाद्य परवाना तसेच अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हे करत असताना शहरातील सर्व लेडीज बार उद्ध्वस्त केले जातील, अशी घोषणाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या वेळी केली.
ठाणे शहरात अनधिकृत इमारतींमध्ये सुरू असलेल्या लेडीज बारविरोधात महापालिका तसेच पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून संयुक्त कारवाई सुरू केली आहे. उच्च न्यायालयाने मध्यंतरी दिलेल्या एका निर्णयानुसार उपाहारगृह तसेच बारला अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला देण्याचे स्पष्ट धोरण आखण्याची सूचना महापालिकेस करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेने अनधिकृत इमारतींमध्ये सुरू असलेल्या उपाहारगृहांना हा परवाना द्यायचा नाही, असा निर्णय बुधवारी घेतला. अग्निशमन विभागाच्या दाखल्यानंतरच पोलिसांकडून व्यवसाय परवाने देण्यात येतात. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील ५० टक्क्य़ांहून अधिक उपाहारगृहे आणि बारवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहरातील इमारतींच्या तळघरात सुरू असलेल्या उपाहारगृहांची संख्या मोठी आहे. मात्र, अशा उपाहारगृहांना कोणत्याही स्वरूपाचा परवाना देण्यात आलेला नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी अशा उपाहारगृहांवर कारवाई करण्याची मागणी करताच आयुक्त जयस्वाल यांनी यासंबंधी कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच शहरातील काही बडय़ा मॉलच्या तळघरामध्ये उपाहारगृह थाटण्यात आल्याची माहिती काही नगरसेवकांनी सभागृहात दिली. त्यानंतर अशा उपाहारगृहांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत शहरातील सर्वच मॉलचे अग्नी परीक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचेही आयुक्त जयस्वाल यांनी या वेळी स्पष्ट केले. येऊर परिसरातील वन विभागाच्या जागेवर उपाहारगृह सुरू असून त्यापैकी तीनच उपाहारगृहांना अग्निशमन विभागाने ना-हरकत दाखला देऊ केला आहे. उर्वरित उपाहारगृहांना अशा स्वरूपाचा दाखला देण्यात आलेला नाही, अशी माहिती अग्निशमन विभागाचे मुख्याधिकारी अरविंद मांडके यांनी या वेळी दिली.