नालासोपाऱ्याच्या पेल्हारमधील बेकायदा औद्योगिक वसाहती जमीनदोस्त

अनधिकृत बांधकामे तोडण्याची महाकारवाई करण्याचा पालिकेचा प्रयोग यशस्वी झाला. बुधवारी पेल्हार विभागात झालेल्या कारवाईत एकाच वेळी सहा ठिकाणचे औद्योगिक गाळे आणि गोदामे जमीनदोस्त करण्यात आली.

अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने दर बुधवारी महाकारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. एकाच प्रभागात एकाच वेळी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करायची अशीे ही योजना होती. पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी ही योजना बनवली होतीे. या योजनेनुसार पालिकेचे पथक बुधवारी सकाळी यंत्रणेसह पेल्हार येथे दाखल झाले. एकूण सहा पथके तयार करण्यात आली. पालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे नऊ प्रभागांतील साहाय्यक आयुक्त, अभियंते या मोहिमेसाठी दाखल झाले. उपायुक्त डॉ. अजिज शेख आणि किशोर गवस कारवाईत प्रत्यक्ष भाग घेतला. ७ जेसीबी यंत्र, ९ फोकलंड यंत्र मागविण्यात आले. पालिकेचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि कर्मचारी असा दोनशे लोकांचा ताफा कारवाईसाठी उतरला. रिचर्डस कंपाऊंड, जाफर पाडा, मणीेचा पाडा, अवधूत आश्रमसमोर तसेच वसई फाटय़ावर ही कारवाई करण्यात आली.  या कारवाईच्या वेळी आम्ही या औद्योगिक पट्टय़ातील सर्व बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त केल्याचे उपायुक्त डॉ. शेख यांनी सांगितले. त्यात गाळे आणि गोदामांचा समावेश होता. ही गोदामे शंभर ते सव्वाशे फूट उंच आणि पन्नास फूट रुंद होती. कुठलीही परवानगी न घेता ती बांधण्यात आली होती. कारवाईदरम्यान किरकोळ प्रकार वगळता कुठलाही अडचण आली नसल्याचे ते म्हणाले.

आयुक्त सतीश लोखंडे दिवसभर या कारवाईवर लक्ष ठेवून आढावा घेत होते. एकाच वेळी मोठी यंत्रणा अतिक्रमणविरोधी कारवाईत लागल्याने कुणाला विरोध करता आला नाही. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियांना त्याची मोठी दहशत बसली. इतर प्रभागात नियमित कारवाई दररोज सुरूच राहणार आहे. बुधवारी ज्यांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली, त्या बिल्डरांवर गुरुवारी संबंधित पोलीस ठाण्यात एमआरटीपीए अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.